नागपूर Devendra Fadnavis On Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (4 ऑगस्ट) चांदीवाल आयोगाच्या अहवालाची प्रत दाखवत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. "खुनाच्या गुन्हातील आरोपीच्या कुबड्यावर देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आलीय," अशी टीका त्यांनी केली. तसंच महायुती सरकार हा अहवाल प्रसिद्ध करत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या आरोपालाच आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया : यासंदर्भात नागपुरात माध्यमांशी संवाद साधत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "चांदीवाल आयोगाची स्थापना महाविकास आघाडी सरकारच्या काळातच झाली. तेव्हाच आयोगानं राज्य सरकारला अहवाल दिला होता. मग तेव्हाच हा अहवाल सार्वजनिक का करण्यात आला नाही? मुळात परमवीर सिंग यांना महाविकास आघाडीनंच आयुक्त केलं होतं. तसंच सचिन वाजेलाही पोलीस विभागात महाविकास आघाडीनेच कार्यरत केलं. विरोधी पक्षाच्या सांगण्यावरुन एखादा पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांवर आरोप कसं करेल? त्यांना स्वतःला नोकरीची काळजी नसेल का? त्यामुळं यासर्व कपोलकल्पित गोष्टी आहेत."
राज्य सरकारचा काहीही संबंध नाही- पुढं ते म्हणाले, "अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या सांगण्यावरुन हे प्रकरण सीबीआयकडं गेलं. यात केंद्र आणि राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. त्यावेळी राज्यात तर त्यांचंच सरकार होतं. तसंच रोज अशाप्रकारे कुणी येऊन बोलत असेल तर त्यांच्या स्तरावर जाऊन या प्रकरणावर बोलायची माझी इच्छा नाही. पण शेवटी सत्य सर्वांना माहिती आहे," असंही ते म्हणाले.
अनिल देशमुख काय म्हणाले होते? : अनिल देशमुख म्हणाले होते की, "माझ्यावर आरोप करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना सचिन वाजेंची मदत घ्यावी लागली. माझ्यावर आरोप झाले तेव्हा या आरोपांची चौकशी व्हावी, असं मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांच्याकडं या प्रकरणाची चौकशी सोपवली. 11 महिन्यात सविस्तर चौकशी करुन माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 1400 पानांचा अहवाल 2 वर्षांपूर्वी सरकारला सादर केला होता. त्या अहवालात मला क्लीन चिट देण्यात आली. परंतु, देवेंद्र फडणवीसांनी हा अहवाल बाहेर येऊ दिला नाही. चांदीवाल यांचा 1400 पानांचा चौकशी अहवाल सार्वजनिक करा," अशी मागणीही यावेळी देशमुखांनी केली.
हेही वाचा -
- "सचिन वाजेंच्या कुबड्यावर देवेंद्र फडणवीसांचे आरोप"; अनिल देशमुखांचा हल्लाबोल, बावनकुळे म्हणाले, 'नार्को टेस्ट...' - Anil Deshmukh Allegations
- गुजरातचा विकास करण्याच्या नादात फडणवीसांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं - रोहित पवार - Rohit Pawar On Devendra Fadnavis
- कैदेतील सचिन वाजेला प्रसार माध्यमांशी बोलण्याची परवानगी कशी? वाजेच्या बंदोबस्तातील पोलिसांना निलंबित करण्याची कॉंग्रेसची मागणी - Atul Londhe On Sachin Waze