कोल्हापूर Rohit Pawar On Devendra Fadnavis : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Election 2024) सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. एकीकडं महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी रोहित पवार यांनी महायुतीवर टीका केली.
...त्यांना दिल्लीवरून आदेश आला असावा : विधानसभा निवडणुकीपूर्वी जे जे सर्वे केले त्यातून राज्यात भारतीय जनता पक्ष 60 जागांच्या पुढे जाऊ शकत नाही. तसंच महायुती 115 जागाही जिंकणार नाही असा अंदाज आहे. तसंच त्यांना दिल्लीवरून आदेश आला असावा आता पर्याय शिल्लक राहिला नाही तुम्ही पूर्वीच्या स्टाईलने जा. कुठेतरी हिंदू-मुस्लिम, ओबीसी-मराठा वाद निर्माण करा आणि त्यावर राजकीय पोळी भाजा असा आदेश केंद्राकडून आला असेल. म्हणूनचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी वक्तव्यं करत आहेत. महायुतीचे नेते महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला घाबरले आहेत. म्हणूनच फडणवीस लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 14 जागांवर व्होट जिहाद झाल्याचं बोलतात, असा हल्लाबोल रोहित पवारांनी महायुतीवर केला.
गुरूला गुरुदक्षिणा जपून द्यायला हवी : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांना मी वेळोवेळी गुरुदक्षिणा दिल्याचा उल्लेख केला. याबाबत रोहित पवार म्हणाले, "एखादा गुरू चांगल्या विचाराचा आणि विचारांशी लढणारा असेल तर महाराष्ट्र धर्माच्या हितासाठी तो लढला असेल. तर अशा गुरूला गुरुदक्षिणा जपून द्यायला हवी, मात्र दुर्दैवाने मंत्री हसन मुश्रीफांनी ते विचार जपले नाहीत. विचार जपणं, लोकांसाठी काम करणं हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्या नेत्यांना जमलं नाही", म्हणूनच ते स्वार्थासाठी महायुतीसोबत गेल्याची खरमरीत टीका, आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोबत गेलेल्या नेत्यांवर केली.
राज्य सरकारला आताच गोमाता आठवली काय? : राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी गाई राज्य गोमातेचा दर्जा दिला आहे. रोहित पवारांनी या निर्णयाचं स्वागत केलय. मात्र, गाईचं खरं संगोपन शेतकरी करतात. दुष्काळाच्या काळात पाणी, चारा नव्हता, त्यावेळी दुष्काळग्रस्त भागात राज्य सरकारकडून चारा छावणी काढायला हवी होती. मात्र पाच महिने एकही छावणी राज्य सरकारनं काढली नाही. गोमाता अडचणीत असताना मदत केली नाही. मात्र, आता सरकार अडचणीत असताना गोमाता आठवते हे हास्यास्पद असल्याची टीकाही आमदार रोहित पवार यांनी केलीय.
हेही वाचा -
- 'फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली...', वंचित बहुजन आघाडीचा दावा - Thackeray Vs Fadnavis
- आमदार अतुल बेनकेंना पक्षात घेवून उमेदवारी द्या; शरद पवारांकडं कोणी केली मागणी? - MLA Atul Benke
- "मोदीजी! तुमचा अहंकारही मोडेल...", सोनम वांगचुकच्या अटकेवरुन राहुल गांधी संतापले - Police Detain Sonam Wangchuk