लॉस एंजेलिस - अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (एएमपीएएस) नं बुधवारी ऑस्कर 2025 शर्यतीसाठी पात्र असलेल्या चित्रपटांची निवड जाहीर केली आहे. उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या 'संतोष' या आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती असलेल्या ग्रामीण हिंदी भाषेतील चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' श्रेणीत स्थान मिळालं आहे. जगभरातील देशांनी सादर केलेल्या एकूण 85 चित्रपटांपैकी एकूण 15 चित्रपट या श्रेणीतील ऑस्कर शॉर्टलिस्टसाठी निवडले गेले आहेत.
हा चित्रपट युनायटेड किंगडमनं अकादमी पुरस्कार 2025 साठी त्यांचा अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवला होता. मे 2024 मध्ये 77 व्या कान्स चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता आणि समीक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला होता. या गौरवाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत या चित्रपटाची नायिका आणि भारतीय अभिनेत्री शहाना गोस्वामीेनं इंस्टाग्रामवर आपला आनंद व्यक्त केला आहे.
"आमच्या संतोष चित्रपटाला मिळालेल्या या छोट्याशा गौरवाबद्दल आमच्या टीमसाठी विशेषत: आमच्या लेखिका-दिग्दर्शिका संध्या सुरीला खूप आनंद झाला आहे! ८५ चित्रपटांमधून हा सिनेमा शॉर्टलिस्ट झाला यावर विश्वासच बसत नाही. ज्यांना हा चित्रपट आवडला, पाठिंबा दिला आणि हा चित्रपट ऑस्करसाठी निवडला जाण्यासाठी ज्यांनी मतदान केलं त्या सर्वांची मी आभारी आहे," असं शहाना गोस्वामीेनं प्रतिक्रियामध्ये लिहिलं आहे.
संध्या सुरी दिग्दर्शित 'संतोष' या चित्रपटात शहाना ही एक तरुण हिंदू विधवेची भूमिका साकारत आहे. तिला सरकारच्या अनुकंपा तत्वाखाली पोलीस हवालदार म्हणून तिच्या पतीची नोकरी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या कथेत, शहाना ही अतिमागास समाजाच्या एका किशोरवयीन मुलीच्या निर्घृण खून प्रकरणात अनुभवी गुप्तहेर इन्स्पेक्टर शर्मा (सुनीता राजवार) बरोबर तपास करत असताना भ्रष्टाचारात अडकलेली असते. एक वास्तववादी कथानकावर हा चित्रपट नवा अनुभव देणारा आहे.
आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत पुढील फेरीत पोहोचलेले चित्रपट खालीलप्रमाणे आहेत -
- आर्मंड ( आयएफसी फिल्म ) - नॉर्वे
- दहोमी ( मुबी ) - सेनेगल
- इमिला पेरेझ ( नेटफ्लिक्स ) - फ्रान्स
- फ्लो ( जानस फिल्म्स अँड साईडशो ) - लॅटव्हिया
- फ्रॉम ग्राऊंड झिरो ( नो यूएस डिस्ट्रीब्युशन ) - पॅलेस्टाईन
- द गर्ल विथ नीडल (मुबी) - डेन्मार्क
- हाऊ टू मेक मिलीयन्स बिफोर ग्रँडमा डाइज ( वेल गो यूएसए एन्टर्टेन्मेंट ) - थायलंड
- आयएम स्टील हेयर ( सोनी पिक्चर्स क्लासिक्स ) - ब्राझील
- नीकॅप ( सोनी पिक्चर्स क्लासिक्स ) - आयर्लँड
- संतोष ( मेट्रोग्राफ पिक्चर्स ) - युनायटेड किंगडम
- द सीड ऑफ द सॅक्रेड फिग ( निऑन ) - जर्मनी
- टच ( फोकस फिचर्स ) - आइसलॅड
- वेव्ज 9 ( नो यूएस डिस्ट्रीब्युशन ) - झेक रिपब्लिक
- वर्मिग्लिओ ( जानस फिल्म्स ) - इटली
या यादीमध्ये विविध श्रेणींमध्ये स्पर्धा करण्यासाठी अधिकृतपणे पात्र असलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. असं असलं तरी हे चित्रपट अकादमी पुरस्कारांच्या अंतिम नामांकनात पुढे जातील याची खात्री देता येत नाही. सर्व 23 श्रेणींमध्ये नामांकन निश्चित करण्यासाठी ऑस्कर मतदान बुधवार, 8 जानेवारीपासून सुरू होईल आणि ते रविवारी 12 जानेवारी रोजी पूर्ण होईल. शुक्रवारी 17 जानेवारी रोजी नामांकनांची घोषणा केली जाईल.