मुंबई Devendra Fadnavis Speech : मुंबई भाजपाकडून आयोजित करण्यात आलेला लाडक्या बहिणीचा देवा भाऊ कार्यक्रम अंधेरीत संपन्न झाला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला भगिनींसोबत संवाद साधला. तसंच यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
महाराष्ट्राच्या विधानसभेत 100 महिला प्रतिनिधी दिसणार : कार्यक्रमाला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बहिणींनी देवा भाऊ म्हटल्यानंतर मला खूप आनंद होतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय की, विकसित भारत घडवायचा असेल तर मातृशक्तीला आणि बहिणींना देशाच्या मुख्य धारेमध्ये आणावं लागेल. त्यामुळं महिलांच्या जीवनात हळूहळू बदल व्हायला सुरुवात झालीय. आगे आगे देखो होता है क्या... तसंच मोदींनी सांगितलंय की, 2027 नंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभेमध्ये महिला प्रतिनिधी निवडून जातील. महाराष्ट्राच्या विधानसभेत 100 महिला आपल्याला पाहायला मिळतील. तर त्यापेक्षा दुप्पट महिला आपल्याला लोकसभेत पाहायला मिळतील", असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका : "महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला विरोधक नावं ठेवताय. या योजनेविरोधात ते न्यायालयातदेखील गेले. मात्र, न्यायालयानं त्यांना फटकारलं. नंतर ते म्हणाले योजना बंद होईल. मात्र, मी आपणाला सांगू इच्छितो की या सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका. अशा योजना हे सावत्र भाऊ कालही, आजही आणि उद्याही देणार नाहीत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला." पुढे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, " महायुती सरकारनं 31 मार्चपर्यंत योजनेचे पैसे ठेवलेले आहेत. महायुतीचं सरकार असेपर्यंत योजना कोणीही बंद करू शकत नाही. पंधराशे रुपयात काय होणार? असं विचारणाऱ्यांना सांगतो, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्यांना पंधराशे रुपयांची किंमत समजू शकत नाही. याला उत्तर आमच्या लाडक्या बहिणीच देतील," असंही ते म्हणाले.
लाडकी मुलगी आणि लाडका मुलगा - पुढं ते म्हणाले की, "महाविकास आघाडीत लाडकी मुलगी आणि लाडका मुलगा या दोनच योजना चालतात. मुख्यमंत्री झाला तर माझा मुलगा आणि पंतप्रधान झाला तर माझा मुलगा आणि मुख्यमंत्री झाली तर माझी मुलगी, अशाच योजना त्यांच्याकडं आहेत. आमच्याकडं बारा कोटी जनतेतील महिला या आमच्या भगिनी आहेत. बहिणींनी बांधलेली ही राखी असं कवच आहे, की त्यामुळे मला कोणी काही करू शकणार नाही."
हेही वाचा -
- "...तर लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट होणार", मुख्यमंत्री शिंदेंचं लाडक्या बहिणींना आश्वासन - Ladki Bahin Yojana
- लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोड्यानं मारा - मुख्यमंत्री - Majhi Ladki Bahin Yojana
- लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम आली; तरीही बँकांसमोर महिलांची गर्दी... काय आहे कारण? - Ladki Bahin Yojana