मुंबई Lok Sabha Election 2024 : 19 एप्रिल रोजी राज्यसह देशातील पहिल्या टप्प्याचं लोकसभेचं मतदान होत आहे. मात्र, अजूनही राज्यातील महायुतीमध्ये जागावाटपावरून अंतिम निर्णय झालेला नाही. काही जागांवरून महायुतीत एकमत होत नसल्यामुळं राज्यातील काही जागांचा तिढा कायम आहे. मात्र, महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपा या पक्षातील नेत्यांनी जागांवरुन केलेल्या दाव्यामुळं दिल्लीतील भाजपाचे पक्षश्रेष्ठी, महाशक्ती नाराज असल्याचं समजतंय. महायुतीतील नेत्यांनी केलेली वेगवेगळी वक्तव्यं हे महाशक्तीच्या निदर्शनास आल्यामुळं महाशक्तीनं नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
महायुतीतील नेत्यांची वेगवेगळी वक्तव्य : महायुतीत चार ते पाच जागांचा अद्याप तिढा कायम आहे. या जागांवर महायुतीतील नेत्यांमध्ये एकमत होत नाहीय. यामुळं या जागांवर महायुतीत तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत आहे. दरम्यान, नाशिक, ठाणे, दक्षिण मुंबई आणि पालघर या जागेवर महायुतीनं अद्यापपर्यंत उमेदवार दिलेला नाहीय. परंतु या जागेवरून भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यामुळं गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीय. तसेच या ठिकाणी आपल्या पक्षाचा दावाही करण्यात येत आहे. नाशिक, ठाणे या जागा शिवसेनेच्या वाट्याच्या आहेत. मात्र, नाशिक जागेवर राष्ट्रवादीनं दावा केला असून, येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळावी असा आग्रह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे. तसेच दक्षिण मुंबईतून योग्य उमेदवार मिळत नसल्यामुळं या जागेवरील तिढा सुटत नाहीय. येथे कुठला उमेदवार द्यावा हे महायुतीसमोर आव्हान आहे.
'या' जागेचाही तिढा कायम : पालघर ही भाजपाची जागा असली तरी अद्यापपर्यंत इथे उमेदवार देण्यात आलेला नाहीय. जरी कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी देण्यात आली असली तरी सुद्धा स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. स्थानिकांनी श्रीकांत शिंदेंच्या विरोधात उघडपणं भाष्य करत नाराज व्यक्त केलीय. दुसरीकडं ठाणे ही शिवसेनेची जागा असताना येथे भाजपाकडून दावा करण्यात येत आहे. या जागेचाही तिढा कायम आहे. तर ठाणे जागा ही आमची हक्काची जागा आहे असं शिवसेनानं (शिंदे गट) म्हटलंय. नाशिक येथे आमचा विद्यमान खासदार असून ही जागा आमचीच आहे असंही शिंदे गटातील नेत्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुसरीकडं याच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या जागांवरून महायुतीतील नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिल्या आहेत.
अजून कोणत्या जागांचा तिढा कायम? : महाविकास आघाडीची अंतिम यादी काहीच दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलीय. मात्र, दुसरीकडं अजूनही महायुतीत एकमत होत नसून, जागावाटपावर काही ठरताना दिसत नाहीय. राज्यातील काही जागांवर अजून तिढा कायम आहे. यामध्ये नाशिक, ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई आणि रत्नागिरी-सिधुदुर्ग इत्यादी जागांवर उमेदवार निश्चित होत नाही. नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. परंतु, त्यांच्या उमेदवारीला स्थानिकांनी विरोध केलाय. त्यामुळं गोडसेंना तिकीट मिळण्याची शक्यता कमीच असल्याचं बोललं जातय. दक्षिण मुंबईत योग्य तो उमेदवार मिळत नसल्यानं जागेचा तिढा अजून कायम आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथे नारायण राणे इच्छुक आहेत. त्यांनी जरी प्रचाराला सुरुवात केली असली तरी या ठिकाणी अजूनही उमेदवार जाहीर झाला नाहीय. याचबरोबर ठाण्यात शिवसेनेला योग्य उमेदवार मिळत नाहीय. पालघरचाही तिढा कायम आहे. मात्र पुढील दोन-चार दिवसात महायुतीतील जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, असं महायुतीतील नेत्यांनी म्हटलंय.
महाशक्ती नाराज का? : राज्यातील तिन्ही पक्षांतील नेते जागा वाटपावरून माध्यमांसमोर उघडपणं भाष्य करत आहेत. हे भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना आणि महाशक्तीच्या निदर्शनास आल्यामुळं त्यांनी महायुतीतील नेत्यांवर नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. कारण मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि भाजपाचे एनडीए सरकार पुन्हा आणण्यासाठी एक-एक खासदार आणि एक-एक मत आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. असं असताना उमेदवारी आणि जागा वाटपावरून महायुतीतील नेत्यांची वेगवेगळी मत आणि त्यांच्या प्रतिक्रिया लोकांमध्ये जात आहेत. यामुळं लोकांमध्ये, मतदारांमध्ये एक वेगळा नकारात्मक मेसेज जाऊ शकतो. चुकीचं संदेश जाऊ शकतो. त्यामुळं भाजपाबद्दल किंबहुना महायुतीबद्दल लोकांच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. नेत्यांच्या वेगळ्या बोलण्यामुळं आपल्यामध्येच एकी नसल्याचा चित्र लोकांमध्ये जाऊ शकतं. त्याचा परिणाम मतदानावर पडू शकतो, असं महाशक्तीनं म्हटलंय. याच कारणामुळं महाशक्तीनं नाराजी व्यक्त केली आहे.
देशात भाजपाच्या विरोधात वातावरण : सध्या जे सर्वे आहेत ते भाजपाच्या विरोधात आहेत. देशभरामध्ये भाजपाच्या विरोधात वातावरण आहे. एक-एक मत आणि एक-एक खासदार भाजपासाठी महत्त्वाचा आहे. तरच ते बहुमताचा आकडा पार करू शकतील, असं दिल्लीतील राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी म्हटलंय. भाजपा पक्षश्रेष्ठी आणि महाशक्ती जाणून आहे की, आपल्या विरोधात वातावरण आहे. त्यामुळं जी आपण विकासकामं केली आहेत ती घेऊन लोकांना समोर गेलं पाहिजे. लोकांसमोर जात असताना महायुतीतील संभ्रम आणि गोंधळाची परिस्थिती न ठेवता आपल्यात समन्वय आहे, हे चित्र त्यांच्यासमोर निर्माण केलं पाहिजे, तरच त्या लोकांचं मतदान हे महायुतीकडं वळू शकतं. त्यामुळं गोंधळ निर्माण होतील असं वक्तव्य टाळण्याच्या सूचनाही भाजपा पक्षश्रेष्ठीने महायुतीतील नेत्यांना दिल्याचं समजतं असंही दिल्लीतील राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी म्हटलंय. परंतु, सध्या देशभरात भाजपाच्या विरोधात वातावरण आहे. सर्वेही भाजपाच्या विरोधात येताहेत. भाजपाचे जे निष्ठावंत आणि ज्येष्ठ नेते होते त्यांना बाजूला सारून किंवा ते नसल्यामुळं नवीन आलेल्या नेत्यांना राज्यातील परिस्थिती नियंत्रणात राखता येत नाही. लहानसहान कारणासाठी त्यांना दिल्लीवारी करावी लागते. याच्यातच त्यांचं अपयश दिसून येत असल्याचंही अशोक वानखेडे यांनी म्हटलंय.
पक्षश्रेष्ठींचा आमच्यावर विश्वास : सध्या राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचे सरकार आहे. हे आमचे महायुतीचे सरकार उत्तम काम करत असून, आमच्यात सर्व काही आलबेल आहे. तिन्ही पक्षातील तीन मुख्य नेते यांच्यात चांगला समन्वय आहे. कामावर दिल्लीतील पक्षश्रेष्ठी खुश आहेत. जागा वाटपावरून पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं मुळीच कारण नसल्याचं भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांनी म्हटलंय. जास्तीत जास्त जागा या आपणाला मिळाल्या पाहिजेत, अशी कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची भावना असते. याचा अर्थ असा नाही की, तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नाही. उलट पक्षश्रेष्ठी आमच्यावर नाराज असल्याचं विरोधक वावड्या उठवत आहेत असंही गणेश हाके यांनी म्हटलंय.
बोलताना भान राखणं महत्त्वाचं : महायुतीतील जागावाटप अद्यापपर्यंत सुटत नाहीय. आपणाला योग्य उमेदवार मिळत नसून दिल्लीतील पक्षश्रेष्ठीनं महायुतीतील नेत्यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. असा प्रश्न शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांना विचारला असता, राज्यात पाच टप्प्यात मतदान होत आहे. अजून मतदानासाठी अवकाश आहे. परंतु कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना असतात. त्यामुळं ते काही भूमिका मांडत असतात. परंतु प्रवक्त्यानी पक्षाची भूमिका मांडताना मात्र, जी गाईडलाईन आहे ती पाळली पाहिजे. अधिक जागांची मागणी करण्याचा तिन्ही पक्षांना अधिकार आहे. जो जागा वाटपाचा तिढा आहे तो तिन्ही पक्षातील पक्षश्रेष्ठी बसून चर्चा करून प्रश्न सोडवतील. जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षातील नेते बोलत असताना आपण महायुतीत आहोत आणि पक्षाची जी नियमावली आहे. त्यावरच भाष्य केलं पाहिजे. बोलताना भान ठेवलं पाहिजे असंही शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- ठाकरेंसमोर काँग्रेस चितपट; दोन कळीच्या जागांवर मारली बाजी - Lok Sabha Election 2024
- पुण्याचं व्हिजन मांडत असताना मोहोळ आणि धंगेकर यांच्यात जुंपली; शेवटी वसंत मोरेंनी घेतला 'मनसे'चा सहारा - Lok Sabha Election 2024
- भाजपाकडून उदयनराजे भोसले यांना अखेर उमेदवारी जाहीर, काय आहे साताऱ्यात स्थिती? - udayanraje bhosle