नांदेड : येथील एका मतदारसंघातील उमेदवारांमुळं महाविाकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून येत आहे. नांदेड उत्तर मतदारसंघात महाविकास आघाडीतील दोन पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरवल्यानं कार्यकर्ते संभ्रमात असल्याचं पाहायला मिळालं. आता हा संभ्रम खुद्द उद्धव ठाकरे यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला.
शरद पवार - उद्धव ठाकरे यांचे वेगळे सूर : शरद पवार यांनी शनिवारी नांदेड उत्तरचे महाविकास आघाडीचे उमेदवार हे काँग्रेसचे अब्दुल सत्तार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर रविवारी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारासाठी नांदेडमध्ये हजेरी लावत प्रचार केला. संगीता पाटील डक या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. नांदेड उत्तरच्या जागेवर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे दोघेही उमेदवार उभे आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. यातील संभ्रम उद्धव ठाकरे यांनी दूर केला. "आपण महाविकास आघाडीत आहोत, पण जिथं जिथं मशाल तिथं तिथं मशाल आलीच पाहिजे," असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
शिवसैनिकांना केलं आवाहन : नांदेड उत्तरच्या विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली. काँग्रेसकडून अब्दुल सत्तार तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संगीता पाटील डक यांना उमेदवारी देण्यात आली. शनिवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नांदेड उत्तरमधून काँग्रेसचे उमेदवार अब्दुल सत्तार हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचं सांगितलं होतं. तर रविवारी उद्धव ठाकरे यांनी संगीता पाटील डक यांना निवडून आणण्याचं आवाहन शिवसैनिकांना केलं. त्यामुळं नांदेडमधील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचं दिसून आलं.
चौरंगी लढत होणार : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. या लढतीकडं सर्वाचं लक्ष लागलंय. या मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात बालाजी कल्याणकर (शिवसेना) विरुद्ध अब्दुल सत्तार (काँग्रेस) विरुद्ध संगीता पाटील (शिवसेना - उबाठा पक्ष) विरुद्ध मिलिंद देशमुख (भाजपा बंडखोर) अशी चौरंगी लढत होत आहे. त्यामुळं यावेळी नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -