शिकागो Sam Pitroda On tax : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा आपल्या एका वक्तव्यामुळं चांगलेच चर्चेत आले आहेत. अमेरिकेत वारसा कर आकारला जातो. जर एखाद्याची निव्वळ संपत्ती 100 दशलक्ष असेल आणि तो मरण पावल्यावर तो फक्त 45% त्याच्या मुलांना हस्तांतरित करु शकतो. 55 टक्के संपत्ती सरकार घेते. हा एक कायदा आहे. त्यात म्हटलंय की, "तुम्ही तुमच्या पिढीत संपत्ती निर्माण केली. आता तुम्ही निघून जात आहात. तुम्ही तुमची संपत्ती सर्वच नाही तर अर्धी लोकांसाठी सोडली पाहिजे. जे मला योग्य वाटते," असं सॅम पित्रोदा यांनी म्हटलंय.
भारतात हा कायदा नाही : पित्रोदा पुढे म्हणाले, 'भारतात वारसा कर नाही. जर एखाद्याची संपत्ती 10 अब्ज असेल तर त्याच्या मुलांना 10 अब्ज मिळतात. जनतेला काहीच मिळत नाही. त्यामुळं हे असे मुद्दे आहेत, ज्यांवर लोकांना वाद घालावे लागतील. दिवसाच्या शेवटी काय निष्कर्ष निघेल, हे मला माहित नाही, पण जेव्हा आपण संपत्तीच्या पुनर्वितरणाबद्दल बोलतो तेव्हा आपण नवीन धोरणं आणि नवीन कार्यक्रमांबद्दल बोलत असतो. ते केवळ अतिश्रीमंतांच्याच नव्हे तर लोकांच्या हितासाठी असतात."
असा विचार करणं मुर्खपणाचं : पुढे काँग्रेसचे नेते पित्रोदा म्हणाले, " हा धोरणात्मक मुद्दा आहे. काँग्रेस पक्ष असं धोरण तयार करेल ज्याद्वारे संपत्तीचं वितरण अधिक चांगलं होईल. आमच्याकडे किमान वेतन नाही. भारतात, जर आपण देशातील किमान वेतन निश्चित केलं आणि असं म्हटलं की गरीबांना इतका पैसा द्यायचा असेल तर ते संपत्तीचं वितरण आहे. आज श्रीमंत लोक शिपाई, नोकर आणि घरातील नोकरांना पगार देत नाहीत," असंही पित्रेदा म्हणाले. पित्रोदा म्हणाले, " तसंच भरपूर पैसा असलेले दुबई आणि लंडनमध्ये सुट्टी घालवण्यासाठी खर्च करतात. जेव्हा तुम्ही संपत्तीच्या वाटपाची चर्चा करता तेव्हा तुम्ही खुर्चीवर बसून म्हणाल की माझ्याकडे इतका पैसा आहे. मी ते सर्वांना वाटून देईन, असा विचार करणं मूर्खपणाचे आहे. काही देशाचे पंतप्रधान असा विचार करतात," असं त्यांनी म्हटलंय.
पित्रोदांच्या वक्तव्यावर काय म्हणाले जयराम रमेश : काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलंय की," 'सॅम पित्रोदा हे माझ्यासह जगभरातील अनेकांचे गुरु, मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक आहेत. पित्रोदा त्यांना प्रकर्षानं जाणवणाऱ्या मुद्द्यांवर मोकळेपणानं आपली मतं मांडतात. लोकशाहीत व्यक्तीला त्याच्या वैयक्तिक विचारांवर चर्चा करण्यास, व्यक्त करण्यास आणि वादविवाद करण्यास स्वातंत्र्य असते. याचा अर्थ असा नाही की पित्रोदा यांचे विचार नेहमीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थिती दर्शवतात. त्यांना संदर्भाबाहेर चुकीचा निष्कर्ष काढणे हा नरेंद्र मोदींच्या द्वेषपूर्ण आणि खोडसाळ निवडणूक प्रचारापासून लक्ष विचलित करण्याचा हेतुपुरस्सर आणि हताश प्रयत्न आहे.
हेही वाचा :