अहिल्यानगर : लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव भाजपाचे माजी खासदार सुजय विखेंच्या (Sujay Vikhe) चांगलाच जिव्हारी लागलाय. त्यामुळं सुजय विखेंनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याविरोधात शड्डू ठोकलाय. त्यांनी थोरात यांच्याविरोधात प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. मात्र, असं असतानाच सुजय विखे यांच्या सभेत बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलंय. त्यामुळे याचे पडसाद संपूर्ण तालुक्यात उमटत असल्याचं बघायला मिळतंय.
नेमकं काय आहे प्रकरण? : संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात शुक्रवारी (25 ऑक्टोबर) सुजय विखे यांची सभा झाली. या सभेदरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर सभास्थळी ठिय्या मांडत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यानंतर देशमुखांविरोधात थोरात समर्थक संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर जमा झाले. यावेळी जयश्री थोरात, माजी आमदार सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलन करत वसंतराव देशमुख यांच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर आज (26 ऑक्टोबर) पहाटे वसंतराव देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गाड्यांची तोडफोड अन् जाळपोळ : वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. तालुक्यात अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळच्या घटना घडल्यानं संगमनेरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान, या प्रकारानंतर सुजय विखे यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेत वसंतराव देशमुख यांनी केलेलं विधान आक्षेपार्ह असल्याचं म्हटलंय. तसंच महिलेविरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, आमच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या दोषींवर देखील कारवाई व्हावी, अशी मागणीही विखे यांनी केलीय.
हेही वाचा -