मुंबई : ओडिशा राज्य अनेक बाबतीत गुंतवणूकदारांना प्राधान्य देत आहे. आगामी काळात ओडिशामध्ये पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणणार असल्याचा दावा, मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी केलाय. ते आज मुंबईत ओडिशा राज्याच्या गुंतवणूक परिषदेत बोलत होते.
गुंतवणूक परिषदेचं आयोजन : ओडिशा राज्यामध्ये विपुल खनिज संपत्ती आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. एखाद्या राज्याला खनिज संपत्तीचं, बंदरांचं वरदान लाभणं हे निश्चितच आनंददायी आहे. ओडिशा राज्यामध्ये गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. अधिकाधिक उद्योजकांनी ओडिशामध्ये गुंतवणूक करावी, यासाठी ओडिशा राज्याच्यावतीनं मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये शनिवारी एका गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्यासह उद्योग मंत्री, राज्याचे मुख्य सचिव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हेमंत शर्मा तसंच अनेक उद्योजक उपस्थित होते.
उद्योजकांना दिली गुंतवणूक पत्रे : ओडिशा राज्यामध्ये गुंतवणूक करण्याच्यादृष्टीनं अनेक कंपन्यांना आवाहन करण्यात आलं आहे. यावेळी टाटा, सुप्रीम इंडस्ट्रीज, यांच्यासह रासायनिक प्लास्टिक तसंच ऊर्जा विभागातील अनेक कंपन्यांनी गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केलीय. तसं पत्र संबंधित कंपन्यांना यावेळी प्रदान करण्यात आलं आहे.
उद्योजकांना देण्यात येणार सवलती : यावेळी बोलताना मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले की, राज्यातील उद्योजकांना आम्ही नेहमीच प्रोत्साहन आणि प्राधान्य दिलं आहे. उद्योगांना आम्ही जमीन, पाणी, वीज आणि गुंतवणुकीसाठी लागणाऱ्या कर सवलती मोठ्या प्रमाणात दिल्या आहेत. ओडिशा राज्य अन्य राज्यांच्या तुलनेत गुंतवणूकदारांसाठी अधिक सवलती देणारे राज्य आहे.
पायाभूत सुविधा उपलब्ध : ओडिशा राज्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. आमच्याकडं सुसज्ज बंदरे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. त्यामुळं आमच्याकडं पोलाद उद्योग यासह अन्य उद्योग मोठ्या प्रमाणात आपली कार्यक्षमता सिद्ध करू शकतात. अशा सर्व उद्योगांना आम्ही आज आमच्याकडं गुंतवणूक करण्यासाठी आवाहन करत आहोत. ओडिशाचा विकासदर सुद्धा अतिशय चांगला आहे. आम्ही महाराष्ट्राकडून यशस्वी होण्याचा मार्ग स्वीकारत आहोत. जास्तीत जास्त गुंतवणूकदारांनी आम्हाला मदत करावी, ओडिशाकडून त्यांना शक्य तितकी मदतच मिळेल, असं मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले.
हेही वाचा -