मुंबई Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे. सोमवारपासून मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालीय. सरकारनं मराठा आरक्षणावर एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं होतं. यात १० टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्याचं विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलंय. यानंतर आता मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाल्यामुळं त्याचा फायदा मराठा समाजाला होणार आहे.
नोकर भरतीसाठी आरक्षण लागू : मराठा आरक्षण अंमलबजावणीबाबत शासन निर्णयाचं राजपत्र जारी करण्यात आलंय. या व्यतिरिक्त बिंदू नामावलीही जाहीर करण्यात आलीय. मराठा आरक्षण विधेयक विधान भवनात मंजूर करण्यात आल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झालीय. मात्र यापूर्वी ज्या सरकारी नोकर भरती झाल्या आहेत, त्यासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही. मात्र, 26 फेब्रुवारीनंतर होणाऱ्या भरती प्रक्रियेला हे आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळं आता मराठा समाजातील मुला-मुलींना नोकर भरतीसाठी आणि शैक्षणिक सवलतीसाठी १० टक्के आरक्षण मिळणार आहे.
आरक्षणाचा फायदा समाजाला होईल : मराठा आरक्षणाचा जीआर निघाला आहे. या आरक्षणामुळं मराठा समाजातील वंचित घटकांना न्याय मिळेल, याचा फायदा मराठा तरुण आणि तरुणींना होईल. कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं मला समाधान आहे. ‘मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती की, मराठा समाजाला आरक्षण देईन आणि ते मी पूर्ण केल्यामुळं आनंद होत आहे', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय.
आरक्षणाचा फायदा कशासाठी : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मागील काही वर्षापासून लाखोंच्या संख्येनं मोर्चे निघाले. आंदोलन झाली, इतके वर्ष मराठा समाजाने संघर्ष केलाय. मात्र यावर तोडगा काही निघत नव्हता. मात्र मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषणं करत सरकारला आरक्षण देण्यासाठी भाग पाडलं. त्यामुळं आता मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळणार आहे. या आरक्षणाचा फायदा मराठा नोकर भरती आणि शिक्षण सवलतीत होणार आहे.
आरक्षणामुळं जरांगे-पाटील समाधानी : राज्य सरकारनं मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे. पण अद्यापर्यंत मराठा आरक्षण केंद्रात लागू झालेलं नाही. तसेच हे केवळ राज्यापुरतं मर्यादीत असेल. या आरक्षणाबाबत अजूनही स्पष्टता नाही. तसंच सगेसोयरे अधिसूचनेवर 6 लाख हरकती आल्यात. याचे वर्गीकरण आणि छाननी आहे. त्यामुळं यामध्ये गोंधळ आणि अस्पष्टता असल्यामुळं आणि हे आरक्षण फक्त राज्यात असल्यानं राज्याबाहेरील मराठा समाजाला याचा फायदा होणार नाही, असं जरांगे-पाटील यांचं म्हणणं असल्यामुळं ते या आरक्षणावर असमाधानी आहेत.
हेही वाचा -