मुंबई CM Eknath Shinde Exclusive : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालीय. यानंतर आता प्रत्येक राजकीय पक्ष आपापली आकडेमोड करत विजयाचं गणितं मांडत आहे. या लोकसभा निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास ईटीव्ही भारत नेटवर्कसाठी ईटीव्ही भारत-महाराष्ट्रचे संपादक सचिन परब यांना 'एक्स्लुसिव्ह' मुलाखत दिली. यात त्यांनी नरेंद्र मोदी हेच देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त करत उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. आपल्या या रोखठोक मुलाखतीत शिंदे यांनी 'इंडिया' आघाडी सत्तेत आल्यास भाजपाप्रणित एनडीएच्या नेत्यांना तुरुंगात डांबणार, या काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवली. मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे लंडन येथे सुट्टीचा आनंद घेत आहेत. आपण लंडनवारी का टाळली? नरेंद्र मोदी हे आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच मुंबईतल्या रस्त्यावर का उतरले, याचंही कारण त्यांनी सांगून टाकलं. विशेष म्हणजे "ज्याप्रमाणे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केलं, त्याप्रमाणे तुमच्याविरोधात कुणी बंड केलं तर काय कराल?" या प्रश्नाचं सुद्धा त्यांनी दिलखुलास उत्तर दिलं.
आमचं काम पाहून लोक आम्हाला साथ देतील : यावेळी निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "पाच टप्प्यांत निवडणुका असल्यानं व्यग्र होतो. मला विश्वास आहे, आमच्या सरकारनं दोन वर्षांत केलेली अनेक विकासकामं मग ते मेट्रो प्रकल्प, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, मुंबईतील काँक्रिट रोड, अटल सेतू अशी कामं केली आहेत. तसंच सरकारनं शेतकरीवर्ग, तरुणवर्ग आणि महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मोदी सरकारनंही कामं केली आहेत. ते काँग्रेसला शक्य झालं नाही. लोक कामाला प्राधान्य देतात. त्यामुळं महाराष्ट्रात 40 पेक्षा जास्त जागा महायुतीला मिळतील असा विश्वास आहे." तसंच, आमचं सरकार स्थापन होण्यापूर्वी महाराष्ट्र जीडीपीत आणि एफडीआयमध्ये मागे होतं. आमचं सरकार आल्यानंतर जीडीपीत क्रमांक एक आणि एफडीआयमध्ये पुढे आला. पूर्वी उद्योग पळून जात होते. आता येत आहेत. आमचं सरकार आल्यानंतर चांगले बदल झाले आहेत. आम्ही उद्योगांना प्रोत्साहन दिलं, एकखिडकी मंजूरी दिली, रेड कार्पेट दिलं. आमच्याकडं चांगल्या पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आहे. आम्ही राज्य विकासाकडं नेत असून डबल इंजिन सरकारमुळं प्रोत्साहन मिळत आहे," असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. घरी बसून फेसबुक लाईव्ह केल्यानं मतदान मिळत नाही, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.
पंतप्रधानांनी रोड शो करु नये असा कायदा आहे का?: 'अबकी बार चार सौ पार' असा नारा देत भाजपा लोकसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. मात्र ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी फार सोपी जाणार नाही, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. मोदींना आपला विजय निश्चित करण्यासाठी अक्षरशः रस्त्यावर उतरावं लागलं, अशी टीका विरोधकांनी केली. त्याला उत्तर देताना, ''पंतप्रधानांनी रोड शो करु नये असा कायदा आहे का?" असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. "मोदींना लोकांची पसंती आहे. जेव्हा आम्ही मोदींना बोलावतो तेव्हा ते आनंदानं येतात. कारण, त्यांनाही विकास आवडतो. लाखो लोक त्यांना पाहण्यासाठी येतात. विरोधकांना रस्त्यावर आणण्यासाठी पंतप्रधान रस्त्यावर उतरले आहेत." या शब्दांत त्यांनी विरोधकांवर 'शरसंधान' केलं.
संविधान बदलणार का? : एनडीए सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान बदलणार असा आरोप विरोधकांकडून भाजपा नेत्यांच्या वक्तव्याचा दाखला देत केला जातो. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांकडं मुद्दे नसल्याचा दावा करत, बाबासाहेबांमुळे देश चालतो. बाबासाहेबांच्या संविधानामुळे पंतप्रधान झाल्याचं मोदी सांगतात. काँग्रेसनं दोनवेळा बाबासाहेब यांना निवडणुकीत हरवलं. जोपर्यंत चंद्रसूर्य आहे, तोपर्यंत संविधान कायम राहणार आहे. काँग्रेसनं 82 वेळा घटना बदलल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी भाजपा सत्तेत आल्यास संविधान बदलेल या विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलंय. पंतप्रधान मोदी देशाची प्रगती करुन महासत्ता करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. विरोधक विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. हेमंत करकरे, अशोक कामटे यांच्या हौतात्म्याबाबत शंका व्यक्त करतात. हा त्यांचा अपमान आहे. विरोधक मोदींना हरवणार असं सांगतात. मात्र 2014 मध्ये त्यांचा सुपडासाफ झाला, आताही त्यांची तीच अवस्था होईल, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.
"राहुल गांधी यांना पंतप्रधानपद हे दिवास्वप्न" : सत्तेत आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना तुरुंगात पाठविणार असल्याचं काँग्रेस नेता खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्याची खिल्ली उडवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल यांच्या पंतप्रधान बनण्याची शक्यताच रद्दबातल ठरवली. "राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा विचार कुणीही स्वप्नातदेखील करणार नाही. भारत जोडो, भारत तोडो करत राहुल गांधी थंड हवा खाण्यासाठी देशाबाहेर पळतात. पंतप्रधान मोदी यांनी १० वर्षांमध्ये एकही सुट्टी घेतली नाही. झोपेतही विचारलं तरी लोक सांगतील, मोदी हेच पंतप्रधान हवेत. राहुल गांधी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी कोण घेणार? त्यांचं देशासाठी काय योगदान आहे. ते पंतप्रधान कसे होणार? पंतप्रधानच होणार नसतील तर पुढचा प्रश्नच निर्माण होत नाही."
लंडनवारी का टाळली? : सुट्टी घ्यायला तुम्हाला का आवडत नाही, यावर मुख्यमंत्री म्हणाले, "छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळासंदर्भात मीटिंग घेतली. तेथे जनावरांना पाण्याची गरज आहे. त्यासाठी मी सगळी व्यवस्था केली. सरकारची जबाबदारी आहे. मी संवेदनशील माणूस आणि मुख्यमंत्री आहे. शेतकऱ्यांना अडचणीत सोडून थंड हवेत जाणारा मी मुख्यमंत्री नाही. काही निवडणुकीच्या काळापुरते लोकांशी संपर्कात येतात. मी तसा नाही. थंड हवेच्या ठिकाणी जाऊनही मला झोप येणार नाही. निवडणूक असो की नसो मी लोकांची सेवा करणार आहे."
पुण्यातील अपघातानंतर मुख्यमंत्री काय कारवाई करणार? : देशात काही गरीब आणि श्रीमंतासाठी वेगळा कायदा आहे का, असा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, गरीब असो की श्रीमंत सगळ्यांसाठी एकच कायदा आहे. कोणीही कितीही मोठा व्यक्ती असला तरी त्याच्यावर कारवाई करून तुरुंगात पाठवा, अशी पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. मृत्यू झालेले तरुण-तरुणीहीदेखील कोणाचे तरी मुलगा-मुलगी आहेत. कोणीही कितीही मोठी व्यक्ती असो त्याला तुरुंगात पाठवणार आहोत. कोणालाही सोडणार नाही.
बंडखोरीबाबत पश्चात्ताप? : शिवसेनेशी फारकत घेतली, त्याबद्दल पुन्हा वेगळा विचार येतो का? या राजकीयदृष्ट्या नाजूक प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ''हा निर्णय घेणे गरजेचं होतं. ते (उद्धव ठाकरे) खुर्चीच्या प्रेमापोटी आंधळे झाले होते. शिवसेना-भाजपासाठी लोकांनी मतं दिलं होतं. मात्र, काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करण्यात आली. हा लोकांचा विश्वासघात होता. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून दिले होते. त्यांना केवळ सत्ता हवी होती. शिवसेना आणि कार्यकर्त्यांशी देणं-घेणं नव्हतं. आम्ही देशहितासाठी निर्णय घेतला. लोकांना हा निर्णय आवडला आहे. आमच्याबरोबर अनेक लोक येत आहेत." तुमच्या विरोधात कुणी अशी बंडखोरी केली तर काय कराल, यावर मुख्यमंत्री म्हणाले, "मी काम करणारा कार्यकर्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २४ तास काम करतात. त्यांच्याकडून प्रेरणा घेतो. राज्याच्या विकासात आणि परिवर्तनासाठी काम करत आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही."
हेही वाचा :