मुंबई : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेत आपली पुढची भूमिका स्पष्ट केली. 'लाडकी बहीण योजने'बाबतही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली. विधानसभा अध्यक्ष निवड, मंत्रिमंडळ विस्तार याबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं.
पुढील पाच वर्ष स्थिर सरकार : "सर्व समाजाला सोबत घेवून जाणार आहोत. सर्व अडचणींवर मात करत वाटचाल करणार आहोत. हे सरकार पारदर्शक आणि गतीनं कल्याणासाठी काम करेल. बदल्याचं राजकारण करायचं नाही. मात्र, बदल दिसेल असं राजकारण करणार आहोत. संख्येवर विरोधकांचं आम्ही मुल्यमापन करणार नाहीत. त्यांनी योग्य विषय मांडले तर त्याला आम्ही सन्मान देणार आहोत. तसंच 2019 ते 2022 पर्यंत जे धक्के दिसले, तसे धक्के आता पुढे लागणार नाहीत. पुढील पाच वर्ष स्थिर सरकार पाहायला मिळेल," असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षाचा रोडमॅप मांडला.
'लाडकी बहीण योजना' सुरूच राहणार : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना 'लाडकी बहीण योजना' सुरू करण्यात आली होती. ही योजना यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. "'लाडकी बहीण योजना' सुरु ठेवणार आहोत आणि 2100 रुपयेही देणार आहोत. जी आश्वासनं दिली ती पूर्ण करणार आहोत. निकषाबाहेरील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर त्याबाबत विचार केला जाईल. मात्र, त्याबाबतचा निर्णय लवकर घेतला जाणार नाही," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळं लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कोणीही नाराज नाही : "एकनाथ शिंदे हे नाराज नव्हते. त्या फक्त बातम्या पसरल्या होत्या. सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी मी एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. सरकारमध्ये सहभागी होवून पक्ष चालवता येतो हे शिंदे यांना पटलं. त्यामुळं ते नाराज नव्हते. गिरीश महाजन हे फक्त एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. तर ते नाराजी दूर करण्यासाठी गेले अशी बातमी दाखवली होती. त्यामुळं कोणीही नाराज नाही," असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजीनाट्यावर दिली.
मराठा समाजाला न्याय देणार : मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मागील काळात आम्हीच केला आणि यापुढेही मराठा समाजाला आम्हीच न्याय देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
हेही वाचा -