कोल्हापूर : राज्यात महायुती सरकार आल्यापासून आमच्या मंत्रीमंडळाचा विस्तार रखडलाय, जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता तर राधानगरीचे आमदार प्रकाश अबीटकर मंत्रिमंडळात असते. मात्र काळजी करू नका, हा बॅकलॉग भरुन काढू, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अबीटकरांच्या कामांच तोंड भरून कौतुक केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी प्रकल्पाच्या घळभरणी कार्यक्रमाप्रसंगी एकनाथ शिंदे बोलत होते.
गेली सत्तावीस वर्ष रखडलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी प्रकल्पाच्या घळभरणी कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उपस्थिती लावली. यावेळी बोलताना ते म्हणाले, "आमदार प्रकाश अबिटकर हा कार्यकर्ता सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा कार्यकर्ता आहे. प्रकाश अबिटकर उमदा लीडर आहे. मी त्यांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे, त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना जे हवं ते द्या, असं सांगितलं होतं. त्यामुळं या कष्टाळू कार्यकर्त्याला पुन्हा विधानसभेत पाठवा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.
महाविकास आघाडीवर घणाघात : राज्यातील महायुती सरकारनं गेल्या अडीच वर्षात केलेलं काम आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना झालेलं काम याचं मोजमाप होऊ द्या. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी जनतेच्या दरबारातच होईल, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केला.
गेली 27 वर्ष घडलेल्या धामणी प्रकल्पाच्या घळभरणी कार्यक्रमाला येण्याचं भाग्य मला मिळालं. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. मी घळभरणी कार्यक्रमाला आलो, पाणी पुजनालाही नक्की येणार, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना दिला.