कोल्हापूर Chhatrapati Sambhajiraje Birthday : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. स्वराज्य पक्ष संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे महाविकास आघाडीमधून लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत. या संदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात केलेल्या एक्स मीडियातील पोस्टनंतर गेल्या नऊ दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती माध्यमांपासून दूर होते. मात्र, आज (11 फेब्रुवारी) वाढदिवसाचं औचित्य साधत ते समोर आले आहेत. संभाजीराजे यांनी आज वाढदिवसानिमित्त श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. तसंच ते कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत शुभेच्छा स्वीकारल्या आहेत. राज्यभरातून स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आज मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
नॉट रिचेबल संदर्भात बोलणं टाळलं : कार्यकर्त्यांकडून संभाजीराजे छत्रपती यांचे भवानी मंडप येथे जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर त्यांनी श्री करवीर निवासिनी अंबाबाई यांचे दर्शन घेत पूजा केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "वाढदिवसानिमित्त अंबाबाईकडे काहीही वेगळं मागितलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचा वंशज या नात्यानं लोकांची सेवा करणं हेच मागितलं आहे." पुढं लोकसभेसंदर्भात विचारण्यात आलं असता, आज चांगला दिवस आहे. चांगल्या दिवशी चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजेत. तर गेल्या नऊ दिवसांपासून नॉट रिचेबल असण्यासंदर्भात विचारण्यात आलं असता त्यावरदेखील त्यांनी बोलणं टाळलं.
भावी मुख्यमंत्री असलेल्या पोस्टरच्या 101 गाड्या कोल्हापुरात दाखल : संभाजी राजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरसह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल झाले आहेत. विशेषतः नाशिकमधून कार्यकर्त्यांच्या 101 गाड्या कोल्हापूरात दाखल झाल्या आहेत. या सर्व गाड्यांवर भावी मुख्यमंत्री स्वराज्य प्रमुख संभाजी राजे छत्रपती असे पोस्टर लावण्यात आले आहेत. यासंदर्भात कार्यकर्त्यांनी संभाजीराजे छत्रपती हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा दर्शवली आहे. तर संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, माझे कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र आहे. गेले दहा-पंधरा वर्षांपासून मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. आता महाराष्ट्राच्या पलीकडे देशात कसं जाता येईल याकडे आमचं लक्ष आहे, असं ते म्हणाले.
हेही वाचा -