ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान बौद्ध आणि वाल्मिकी समाजानं मोठा निर्णय घेतलाय. "समाजाचे प्रश्न मार्गी लावू, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. तरी देखील समाजाच्या प्रश्नांकडं कानाडोळा केला जात आहे. घराचा प्रश्न, बुद्धविहार बांधण्याचा प्रश्न, कायमच आमच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष केलं जातंय. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत मतदानावर वाल्मिकी समाज बहिष्कार टाकणार आहे," असा इशारा दलित पँथरनं दिला असून, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिलं.
१२ वर्षांपासून पक्के घरे नाहीत : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात राहणाऱ्या वाल्मिकी समाजावर गेल्या काही वर्षांपासून अन्याय होत आहे. मात्र अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्या विधानसभा क्षेत्रात राहून देखील वाल्मिकी समाजाच्या घराचा प्रश्न प्रलंबित आहे. कन्हैया नगर येथे ३० ते ३५ वर्षांपासून वाल्मिकी समाजाची ४५ पक्की घरे होती. पालिकेनं त्याच्या जागेत प्रकल्प बांधणार असल्याचं सांगून घरे खाली करायला लावली होती. मात्र अजूनही कोणालाच घरे मिळालेली नाहीत," असा आरोप दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी केला.
मुख्यमंत्री शिंदेंवर केला आरोप : "कन्हैया नगर येथे राहणारे सर्वजण पालिकेच्या घनकचरा विभागात कॉन्ट्रॅक्टरकडं काम करतात. गेल्या १२ वर्षांपासून आपल्याला पक्की घरे मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु घराचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत घराचा प्रश्न मार्गी लावू, असं मुख्यमंत्री शिंदे सांगतात, तरी घरे दिली नाहीत," असा थेट आरोप दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी केला.
बुद्धविहारचं काम अर्धवट : "गेल्या ११ वर्षांपासून कोपरी सिद्धार्थ नगर येथे बुद्धविहारचं काम देखील अर्धवट अवस्थेत आहे. विधानसभा निवडणूक जवळ आली की, मुख्यमंत्री शिंदे यांना वाल्मिकी आणि बौद्ध समाजाने भरभरून मतदान केलंय. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी समाजाच्या प्रश्नाकडं कायमच दुर्लक्ष केलंय. समाजाचे प्रश्न मार्गी लागत नसल्याचा निषेध व्यक्त करून विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याचं एकमतानं मंजूर करण्यात आलंय. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत," असं दलित पँथरनं स्पष्ट केलंय.
हेही वाचा -