कोल्हापूर Chandrakant Patil : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती 170 जागांच्या खाली येणार नाही. लाडकी बहीण योजना, त्याचबरोबर अन्य चांगल्या योजना या सरकारनं लोकांना दिल्या आहेत. या योजना आणूनही मनात उपकाराची भावना न ठेवण्यासारखी महाराष्ट्राची जनता नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. भुदरगड तालुका येथील खानापूर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
संजय राऊतांवर हल्लाबोल : अमित शाह दूरदृष्टी असणारे नेते आहेत. त्यामुळंच ते 2029 च्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलले असतील, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी अमित शाह यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊतांवर हल्लाबोल केला. चंद्रकांत पाटील म्हणाले, "महान नेत्यांवर बोलण्याचं धाडस फक्त संजय राऊतच करू शकतात. 370 कलम रद्द केलं म्हणून अमित शाह यांना रोज नमस्कार केला पाहिजे. पण चांगलं काम करणाऱ्यांवर टीका करण्याचं काम फक्त राऊतच करू शकतात."
काँग्रेसवर टीका : "प्रकाश आबिटकरांचे वडील बिद्री कारखान्याचे कामगार आणि माझे वडील गिरणी कामगार होते. आज मी मंत्री आहे तर प्रकाश आबिटकर आमदार आहेत. कामगारांची मुलं मंत्री-आमदार कसे होतात? हे काँग्रेसचं दुखणं आहे," असा टोला चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला लगावला.
कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुका दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. चंद्रकांत पाटील यांचं जन्मगाव असलेल्या खानापूर गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेचं लोकार्पण करण्यात आलं. या शाळेत विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयी-सुविधा, आधुनिक प्रयोगशाळा आणि विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित वर्गखोल्या निर्माण करण्यात आल्या आहेत. यातून सक्षम भावी पिढी घडावी, असा मानस चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
हेही वाचा