नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) दिल्लीत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा अध्यक्षा जे. पी. नड्डा यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांशी महाराष्ट्रातील विधानसभा उमेदवारांच्या निवडीवर चर्चा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं (CEC) महाराष्ट्रातील सुमारे 110 जागांसाठी उमेदवार निश्चित केले आहेत. सीईसीनं उर्वरित जागांवर उमेदवारांची नावे निश्चित करण्याची जबाबदारी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर सोपवली आहे. उर्वरित जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी सीईसीची पुन्हा बैठक होणार नाही. यापुढील जागावाटपाची चर्चा महायुतीमधील शिवसेनेचे (शिंदे गट) अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे ( अजित पवार गट) अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत होणार आहे. या चर्चेनंतर उर्वरित जागांसाठी भाजपा आपले उमेदवार लवकरच निश्चित करणार आहे.
बैठकीत काय झाली चर्चा?
- निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊनही महायुतीमधील जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं नवी दिल्लीती बैठकीत महाराष्ट्रातील उमेदवारांच्या निवडीवर सुमारे चार तास चर्चा केली. या बैठकीत केवळ भाजपाच्या जागापुरतीच चर्चा झाली.
- भाजपाच्या विधानसभा जागांची संख्या वाढू शकते किंवा कमी होऊ शकते, यावरही बैठकीत चर्चा झाली. परंतु महायुतीमधील घटक पक्षांचे समाधान करूनच पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. अजित पवारांची राष्ट्रवादीच्या मागणीनुसार जागा दिल्या जाणार नाहीत. त्याबाबत भाजपानं चर्चादेखील केल्याची माहिती सूत्रानं दिली.
- मागील विधानसभा निवडणुकीत भाजपानं 105 जागा जिंकल्या होत्या. सूत्राच्या माहितीप्रमाणे विद्यमान आमदारांची तिकीटे कापण्याच्या स्थितीत भाजपाचे वरिष्ठ नेते नाहीत. मात्र, विद्यमान आमदारांचे नाव सर्वेक्षणात असावे. त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये. तसेच, उमेदवार फार वृद्ध नसावा की त्याची प्रकृती खराब असू नये, अशी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अपेक्षा करण्यात आली आहे.
- गेल्या वेळी भाजपानं महाराष्ट्रात 164 विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यावेळी भाजपा 170 जागांवर निवडणूक लढविणार असल्याचा दावा सूत्रानं केला. केंद्रीय निवडणूक समितीत राज्यातील राजकीय समीकरणाबरोबर सामाजिक समीकरणावर चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत कोणत्या भागात कोणता मुद्दा प्रभावी ठरू शकतो, यावरही चर्चा झाली.
Visuals from the BJP's Central Election Committee meeting at the party's headquarters in New Delhi. pic.twitter.com/lrCzk3iyum
— BJP (@BJP4India) October 16, 2024
जागावाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीत? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाकडून विदर्भ, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. तर शिवसेना शिंदे पक्षाकडून मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जास्त जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत आहे. उमेदवारांची निवड करताना नवीन चेहरे आणि विजयी होऊ शकणाऱ्या उमेदवारांना भाजपाकडून प्राधान्य देण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत येऊ शकतात. हे नेते जागावाटपासाठी गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊ शकतात.
हेही वाचा-