सातारा Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर, सातारा, सांगली, बारामती, माढा, अमरावती, कल्याण, शिरूर, रत्नागिरी-सिंधुदुर्गसह अन्य काही लोकसभा मतदार संघांमध्ये 'हाय व्होल्टेज' लढती झाल्या आहेत. छत्रपतींचे थेट वंशज, महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांच्यातील लढतीच्या निकालाकडं राज्याचं लक्ष लागून आहे. मात्र, निकालाआधीच महामार्गावर शशिकांत शिंदेंच्या विजयाचा बॅनर झळकला. मात्र, कायदा, सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलिसांनी तो बॅनर काढायला लावला. बॅनरमुळं राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आलं.
साताऱ्यात झाली हाय व्होल्टेज लढत : साताऱ्यात महायुतीने उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीने शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर हाय व्होल्टेज लढतीच चित्र स्पष्ट झालं होतं. शशिकांत शिंदे संचालक असलेल्या नवी मुंबई शेती उत्पन्न बाजार समितीतील शौचालय घोटाळ्यावरून महायुतीने प्रचारात शशिकांत शिदेंना टार्गेट केलं. शशिकांत शिंदेंना अटक होणार, अशी एकवेळ परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, शरद पवारांनी गर्भित इशारा देताच सगळ शांत झालं.
कराड दक्षिण, उत्तरचा हात कुणाला? : सातारा लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी मतदान पार पडलं. एकूण १८ लाख ८९ हजार ७४० मतदानापैकी ११ लाख ९१ हजार ८६९ इतकं मतदान झालं. सहा विधानसभा मतदार संघांमधील कोरेगाव, कराड दक्षिण आणि कराड उत्तरमध्ये सर्वाधिक मतदान झालं आहे. कराड तालुक्यातील मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला हात देणार, हे निकालात स्पष्ट होईल. तत्पूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीने 'विजय आमचाच' असल्याचा दावा केला आहे. त्यामुळं साताऱ्यातून नक्की कोण बाजी मारणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
'खासदार शशिकांत शिंदे' नावाच्या पाटीचा फोटो व्हायरल : निकालाआधी विजयाचा बॅनर लावल्याची माहिती मिळताच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तो बॅनर काढायला लावला. मात्र, बॅनरची सगळीकडंच जोरदार चर्चा आहे. तसेच एका कार्यकर्त्यानं देखील शशिकांत शिंदे यांना 'खासदार शशिकांत शिंदे' नावाची सोनेरी पाटी दिल्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी तो आपल्या स्टेटसलाही ठेवला आहे. त्यामुळे सातारकरांची उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा -
- शिवसेना चारही जागांवर निवडणूक लढवणार, काय आहे पक्षाची भूमिका? - Konkan Graduate Constituency
- "गांजा ओढून लेख लिहितात"; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला - Devendra Fadnavis On Sanjay Raut
- EXCLUSIVE: "...म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्त्यावर"; 'ईटीव्ही भारत'च्या मुलाखतीत विरोधकांच्या दाव्याला मुख्यमंत्र्यांचं रोखठोक उत्तर - CM Eknath Shinde Interview