मुंबई Mahayuti government : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारनं राज्यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना महिना दीड हजार रुपये देणार आहे. राज्यातील महिलांकडून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लाडकी बहीण योजनेमुळे जनता आपल्याला आशीर्वाद देईल आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा आपलं सरकार येईल, असं महायुतीतील नेते आत्मविश्वासानं सांगत होते. पण बदलापूर अत्याचार आणि मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं, या दोन घटनांमुळे महायुती सरकार अडचणीत येऊ शकतं का? या दोन घटना महायुती सरकारला धोक्याची घंटा असू शकते का? या घटनांमुळे मतदार नाराज झाले असून, याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
लाडक्या बहिणीमुळे मिळालं होतं बळ : महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे बळ मिळालं होतं. या योजनेचा प्रसार आणि प्रचार महायुतीकडून केला जात होता. शक्तीप्रदर्शन केलं जात होतं. मात्र बदलापूर अत्याचार घटनेनंतर राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेतील सातत्यानं बातम्या समोर येत आहेत. अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच महायुती सरकारनं आठ महिन्यांपूर्वी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. त्यामुळे शिवप्रेमी आणि जनसामान्य लोकांमध्ये संतापाची लाट आहे.
आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी घाईगडबडीनं या पुतळ्याचं अनावरण केलं, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला. पण या दोन घटनांच्या आधी सरकार लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम राज्यभर करत होते. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता सरकारला बळ मिळालं होतं. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी लाडकी बहीण योजना मदत करेल, असंही राजकीय विश्लेषक म्हणत होते. परंतु आता या दोन घटनांमुळे महायुतीच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरल्याचं चित्र आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक : राज्यात बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर सातत्यानं अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या अत्याचाराच्या घटनेवरून समाजात संताप व्यक्त होत आहे, आंदोलनं केली जात आहेत. असं असताना आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं हे सरकार झोपा काढत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या दोन घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप आणि कलगीतुरा रंगलाय. "छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्र घडवला, महाराष्ट्र धर्म वाढवला आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात फक्त आठ महिन्यांपूर्वी बसवलेला त्यांचा पुतळा कोसळतो. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. महाराष्ट्रात या घटनेमुळे या संतापाचं वातावरण आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लागला, असल्याची टीका शिवसेना (ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना महायुती सरकारवर केली.
मतांसाठी योजना नाही : "बदलापूर बलात्कार प्रकरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे या दोन्ही घटना निश्चितच दुर्दैवी आहेत. आता त्याच्यापेक्षाही अधिक भव्य-दिव्य पुतळा आगामी काळात बसवला जाईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही कोणतीही विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून किंवा मतांसाठी आणली नाही. राज्यातील ज्या माता-भगिनी शेती, बांधावर काम करतात, धुणीभांडी करतात त्यांना दीड हजार रुपये मिळावे आणि त्यांच्या संसाराला ते पैसे कामी यावे, यासाठी ही योजना आणली होती," अशी प्रतिक्रिया "ईटीव्ही भारत"शी बोलताना शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी दिली.
मतांसाठी पुतळा बसवला : दुसरीकडे अत्याचार आणि पुतळा कोसळणे या दोन्ही घटनांमुळे सरकारचं अपयश समोर आलं. सरकारचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम, श्रद्धा, दैवत आहे म्हणून त्यांच्यासाठी काम करत नाही, फक्त मतांसाठी त्यांनी हा पुतळा बसवला. अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यालाही सरकार जबाबदार आहे. गृहखाते आणि सरकारचा अजिबात गुन्हेगारांना वचक नाही, त्यामुळे अशा घटना घडतात. या दोन्ही घटना या महायुती सरकारला अडचणीत आणू शकतात, मतदार मतदान करताना नक्कीच या गोष्टींचा विचार करतील, असं "ईटीव्ही भारत"शी बोलताना राजकीय विश्लेषक जयंत माईनकर यांनी सांगितलं.
हेही वाचा
- "वडिलांचा पुतळासुद्धा उद्धव ठाकरेंनी सरकारच्या..."; राजकोट राड्यानंतर नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
- "नौदलाचा सल्ला झुगारून पत्र्याचा पुतळा उभारला", सिंधुदुर्गातील घटनेवर पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक आरोप - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
- "शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले भक्कमपणे उभे, पण..." महाविकास आघाडीचा महायुतीवर निशाणा - statue of chhatrapati shivaji