मुंबई : गुरुवारी (21 नोव्हेंबर) सायंकाळी शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत, अनिल देसाई, काँग्रस नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत निकालानंतर 'मविआ'ला किती जागा मिळतील? त्यानंतरची पुढील रणनीती काय असेल? यासंदर्भात चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय.
कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीचंच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केलाय. "आम्ही जास्तीत-जास्त जागा जिंकणार आहोत. त्यानंतर लवकरच आम्ही सरकार स्थापन करू," असं ते म्हणालेत.
बाळासाहेब थोरात काय म्हणाले? : “बैठकीत आम्ही 288 जागांचा आढावा घेतला. तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की महाविकास आघाडीचंच सरकार बनेल. त्यात आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. असं चित्र आम्हाला स्पष्टपणे दिसतंय. आम्हाला बहुमतापेक्षा कमी जागा येतील असं वाटत नाही. तसंच आमच्याबरोबर कुणी आलं तर आनंदच मानतो. त्यानंतर सरकार स्थापन करताना आम्ही मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करू," असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
- एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात? : P-MARQ च्या एक्झिट पोलनुसार, महायुती आघाडीला 137-157 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 126-147 आणि इतरांना 2-8 जागा मिळतील. चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या अंदाजानुसार, महायुतीला 152-160 जागा, महाविकास आघाडीला 130-138 जागा आणि इतरांना 6-8 जागा मिळतील.
- संपूर्ण देशाचं निकालाकडं असणार लक्ष- विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळं या निकालाकडं अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडीचं सरकार येणार? यासंदर्भात राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. त्यामध्ये काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला कमी जागा मिळण्याचा अंदाज आहे. परंतु, असं असलं तरी निकाल समोर आल्यानंतरच कोणाला किती जागा मिळतात? हे स्पष्ट होईल.
हेही वाचा -