मुंबई Viksit Bharat Sankalp Patra : विकसित भारत नेमका कसा असायला हवा?, या उद्देशानं भाजपाकडून देशभर संकल्प पत्र अभियान राबविलं जाणार आहे. भाजपाच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या आशा-अपेक्षांचं चित्र दिसावं यासाठी या अभियानात मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना सहभागी करून घेण्याचा निर्णय मुंबई भाजपानं घेतलाय. त्यासाठी मुंबईतून 2 लाख सूचना गोळा करण्याचा निश्चय भाजपाकडून करण्यात आलाय.
तयारी लोकसभेची : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून देशभर 15 मार्च पर्यंत 'संकल्प पत्र अभियान' राबविले जाणार आहे. भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा जाहीर केला जाणार आहे, त्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून जनतेकडून सूचना मागविल्या जाणार आहे. या अभियानासाठी देशभरातील नागरिकांच्या सूचना मागविल्या जात आहे. सर्व समाजाच्या सर्व घटकांमधून आलेल्या या सूचनांना एकत्रित केलं जाणार आहे. त्यासोबत विविध औद्योगिक, सामाजिक संस्था, संघटना यांच्याकडून देखील सूचना स्वीकारल्या जाणार आहेत.
मुंबई भाजपा राहणार पुढे : या अभियानासंदर्भात अधिक माहिती देत आशिष शेलार म्हणाले की, "सदर मोहिमेसाठी मुंबईतील मोर्चे आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते सामील होतील. मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशन आणि सार्वजनिक ठिकाणी सूचना पेटी ठेवण्यात येणार आहेत. सोबतच भाजपाचे पदाधिकारी घरोघरी जाऊनही या सूचना गोळा करणार आहेत. मुंबईतील प्रत्येक लोकसभा विधानसभा क्षेत्रातून संकलन पेटीच्या माध्यमातून सूचनांचे संकलन केल्या जाणार असून त्यासाठी एक खास संकल्प पेटी तयार करण्यात आली आहे. तसंच 9090902024 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन संकल्प पत्राच्या सूचना रेकॉर्ड करता येतील. या अभियानासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'नमो ॲपवरून' सूचना पाठविण्यात येतील." तसंच देशपातळीवर निवडणूकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात सामान्य माणसांकडून त्यांची मते, अपेक्षा आणि सूचना मागविण्याची ही पहिलीच वेळ असावी, असा विश्वासही यावेळी शेलार यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -
- भाजपात प्रवेश करणार का ? खासदार नवनीत राणांनी स्पष्टचं सांगितलं; 'उद्या जेपी नड्डांच्या उपस्थितीत करणार शक्ती प्रदर्शन'
- "मुंबई, महाराष्ट्रच नाही तर दिल्लीही तुम्हाला आमच्यामुळं दिसली"; आशिष शेलारांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
- पुणे लोकसभेसाठी भाजपाकडून इच्छुकांची गर्दी; माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले...