मुंबई Arvind Sawant On Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यामुळं लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपा यांची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच महायुतीच्या वतीनं दक्षिण मुंबईतील लोकसभेची जागा मनसेला देण्याचा निर्णय होण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
ईडीच्या चौकशीनंतर भाषा बदलली : ईडीकडून 2019 मध्ये राज ठाकरेंची कोहिनूर मिल प्रकरणी चौकशी झाली होती. याचाच संदर्भ देत अरविंद सावंत म्हणाले की, "राज ठाकरे हे नेहमीच आपल्या भूमिका बदलत असतात. राज ठाकरे यांनी आधी मोदींचं कौतुक केलं मग मोदींवर टीका केली. त्यानंतर शरद पवार यांचं कौतुक केलं, मग शरद पवारांवर टीका केली. आता ते पुन्हा भाजपासोबत जाण्याची भूमिका घेत आहेत. ईडीच्या चौकशीनंतर त्यांच्या भूमिकेत आणि भाषेत झालेला बदल सर्वांना दिसतोय", असा टोला सावंत यांनी लगावला.
दक्षिण मुंबईत फरक पडणार नाही : पुढं ते म्हणाले की, "दक्षिण मुंबई मतदारसंघात जरी माझ्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार उभा राहिला तरी त्यानं फारसा फरक पडणार नाही. कारण, मराठी माणसाला माहीत आहे नेमकं कुणाच्या मागं उभं राहायला हवं. त्यांनी ज्या उत्तर भारतीयांना मारलं ते लोक त्यांच्यामागं उभे राहणार नाहीत, जैन समाज त्यांच्या मागं उभा राहणार नाही. त्यामुळं आपल्याला काहीही फरक पडणार नाही", असा दावाही त्यांनी केला.
वंचितला चार जागा देण्याचा प्रस्ताव : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत, समजूतदार आहेत. परंतु ते तसे वागताना दिसत नाहीत, असा टोला खासदार सावंत यांनी लगावला. आम्ही त्यांना यापूर्वीच सांगितलं आहे की, तुम्हाला चार जागा देऊ त्यानंतर चर्चा नाही. आता काय करायचं हा त्यांचा निर्णय, असंही सावंत म्हणाले.
हेही वाचा -
- MNS BJP Alliance : मनसेच्या इंजिनला कमळाचं इंधन, भाजपासोबत युती झाल्यास मनसेचा फायदा काय? जाणून घ्या समीकरण
- Amit Thackeray News : निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे कुटुंबातील दुसरे सदस्य उतरणार? अमित ठाकरे यांच्या नावाची 'या' मतदारसंघाकरिता चर्चा
- BJP MNS Alliance : राज ठाकरे-अमित ठाकरे दिल्ली दरबारी; भाजपा-मनसेमध्ये बंद दाराआड घडतंय बरंच काही, दक्षिण मुंबईसाठी आग्रही?