अमरावती Pravin Pote on Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत भाजपानं केलेली विकास काम सांगण्याऐवजी विरोधकांवर टीका केली, खरतर ही मोठी चूक ठरली. आता अमरावतीत भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं आपण केलेल्या विकासाची भाषा बोलावी. उचलली जीभ आणि लावली टाळूला असं होता कामा नये, उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यावर आरोप करण्याऐवजी आपण आपली कामं जनतेपर्यंत न्यायला हवीत. देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका आणि शिवीगाळ करण्यासाठी माणसं पोसून ठेवली होती. ही भाजपाची संस्कृती नाही, अशी गंभीर टीका भाजपाचे नेते आणि आमदार प्रवीण पोटे यांनी केलीय. प्रवीण पोटे यांनी राजीनामाचा निर्णय मागं घ्यावा यासाठी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार प्रवीण पोटे यांनी भाजपाच्या भविष्यातील वाटचाली संदर्भात भाष्य केलं.
एकदा थुंकलो ते थुंकलो : अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून माझी असल्यामुळं मी आपल्या पदाचा राजीनामा कालच प्रदेशाध्यक्षांकडे पाठवलाय. आज शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी मी आपला राजीनामा मागं घ्यावा यासाठी ज्या काही भावना व्यक्त केल्या, त्याचा मी आदर करतो. मात्र, मी एकदा थुंकलो तर थुंकलो यामुळं मी स्वतःहून राजीनामा मागं घेणार नाही. माझ्या राजीनाम्यासंदर्भात पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घ्यायचा तो घेतील असं प्रवीण पोटे म्हणाले.
भाजपाच्या मेहनतीमुळंच गाठला मतांचा मोठा टप्पा : लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात भाजपानं पाच लाख सहा हजार मतांचा मोठा टप्पा गाठला. यामागे भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची मेहनत आहे. अनेकदा पहाटे तीन आणि चार वाजेपर्यंत आम्ही आपला उमेदवार निवडून यावा यासाठी मेहनत घेतलीय. आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर कुणी आक्षेप घेत असेल तर ते मी अजिबात खपवून घेणार नाही असं आमदार प्रवीण पोटे म्हणाले.
बाहेरुन आलेल्यांची आरेरावी खपवून घेणार नाही : पक्ष बळकट व्हावा प्रत्येक निवडणुकीत पक्षाचा विजय व्हावा यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी नेहमी मेहनत घेतली. पक्ष बळकट करण्यात आपला सर्वांचा महत्त्वाचा वाटा आहे. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाची उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय माझा राहणार आहे. बाहेरून आलेल्यांची आरेरावी अजिबात खपवून घेतल्या जाणार नाही. आमच्या माणसांना उमेदवारी द्या वगैरे अशी लुडबुड त्यांची चालणार नाही असे देखील आमदार प्रवीण पोटे यांनी स्पष्ट केले.
भाजपा कार्यकर्त्यांनी राजीनामा ना मंजूर करण्याचा घेतला ठराव : आमदार प्रवीण पोटे यांनी पक्षाच्या शहर जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षश्रेष्ठींनी आमदार प्रवीण पोटे यांनी दिलेला राजीनामा ना मंजूर करावा असा ठराव पारित करून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला आहे. आज पक्षाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, शहराचे माजी अध्यक्ष किरण पातुरकर, प्रदेश सचिव जयंत डेहणकर, माजी महापौर किरण महल्ले, चेतन पवार, नितीन धांडे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा :