अमरावती : अमरावतीचे मनसेचे उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी (6 नोव्हेंबर) रात्री सायन्सकोर मैदानावर प्रचार सभा झाली. यावेळी बोलत असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला. "केवळ स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी या पक्षातून त्या पक्षात अनेकांनी गत पाच वर्षात उड्या मारण्याचं काम केलंय," असा टोलाही त्यांनी लगावलाय.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? : यावेळी बोलत असताना राज ठाकरे म्हणाले की, "मुंबई आणि पुण्यात बिहार आणि उत्तर प्रदेशातील तरुणांची रोजगारासाठी गर्दी वाढत आहे. तिकडं विकासाचा पत्ता नाही, म्हणून ते मुंबई-पुण्यात धाव घेतात. मात्र, आता मराठवाडा आणि विदर्भातील तरुण देखील मुंबई आणि पुण्यात मोठ्या संख्येनं येत आहेत. इथल्या साऱ्यांचीच धाव मुंबई आणि पुण्यात असेल तर मग इकडं ज्यांना तुम्ही आजवर निवडून दिलं त्या लोकप्रतिनिधींनी काय केलं? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. खरंतर दुर्दैवानं विकास नेमका कुठं हरवला? असाच प्रश्न पडतोय. केवळ स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी या पक्षातून त्या पक्षात अनेकांनी गत पाच वर्षात उड्या मारण्याचं काम केलं. या सर्व उड्या मारणाऱ्या राजकीय मंडळींना सर्वसामान्य नागरिकांच्या भल्याशी काही एक देणं घेणं नाही", असं देखील राज ठाकरे म्हणाले.
महामानवांचे पुतळे नको विचार हवेत : "उद्धव ठाकरे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आम्ही विविध ठिकाणी उभारणार आहोत. यांना पुतळे कमी पडायला लागले आता मंदिराची गरज भासत आहे. खरंतर कोट्यवधी रुपयांचे पुतळे उभारण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगाला सांगणाऱ्या गड-किल्ल्यांच्या विकासावर पैसा खर्च व्हायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांपेक्षा त्यांचे विचार अतिशय मोलाचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक उभारावं आणि त्या ठिकाणी त्यांची असंख्य पुस्तकं असावी ही खरी गरज आहे", असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
शरद पवारांनी जातीचं राजकारण केलं : पुढं ते म्हणाले की, "संपूर्ण मराठवाडा हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भरवलेला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. या पक्षाच्या निर्मितीनंतर शरद पवार यांनी या हिंदुत्वाच्या मुद्द्यातून लोकांना बाहेर कसं काढायचं, यासाठी जातीचं राजकारण सुरू केलं. तेव्हापासून महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं", अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
- ते फतवे काढतात सावध व्हा : "आता निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उबाठा) या महाविकास आघाडीलाच मत देण्यासंदर्भात ते फतवे काढत आहेत. खरंतर आपण सावध व्हायला हवं. लोकसभा निवडणुकीत अमरावतीच्या खासदारांचा पराभव झाल्यावर या ठिकाणी जे काही झालं ते गंभीर होतं", असं देखील राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा -