मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या आपल्या सभांमधून सत्तेत परतण्याची भाषा करीत आहेत. खरं तर ही निवडणूक मनसे स्वबळावर लढवणार असून, कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्यात. या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे यांनी विविध मतदारसंघांमधून मनसेच्या उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली असून, सोमवारी राज ठाकरे यांनी ठाण्यातून अविनाश जाधव तर कल्याणमधून राजू पाटील यांची उमेदवारी जाहीर केलीय. या आधी शिवडीतून बाळा नांदगावकर तर वरळीतून संदीप देशपांडे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली होती. मात्र, अद्याप मनसेने आपली अधिकृत पहिली यादी जाहीर केलेली नाही. अशातच अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असून, अमित ठाकरेंसाठी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठिंबा मागितल्याचं बोललं जातंय.
राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा : एका बाजूला स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करणारे राज ठाकरे दुसरीकडे मुंबईतील तीन जागांसाठी महायुतीचा पाठिंबा मागत असल्याच्या चर्चा आहेत. या विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित ठाकरे यांना महाविकास आघाडी पाठिंबा देणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात असतानाच लोकसभेत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे किमान महायुतीने तरी अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा सध्या मनसेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जातेय. या संदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सोमवारी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चर्चा केल्याचं बोललं जातंय.
वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे लढत : मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी केवळ माहीम विधानसभा मतदारसंघात महायुतीचा पाठिंबा न मागता शिवडी, वरळी विधानसभा मतदारसंघातदेखील पाठिंबा मागितल्याचं बोललं जातंय. महायुतीने राज ठाकरे यांना पाठिंबा दिल्यास वरळी विधानसभेतील लढत आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे अशी होण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर शिवडी विधानसभेतील लढत ही अजय चौधरी विरुद्ध बाळा नांदगावकर अशी होण्याची शक्यता वर्तवली जातेय. तसेच विधानसभेत मात्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास बिनविरोध जागा निघू शकते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
अमित ठाकरे बिनविरोध निवडून येणार का? : महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्याशी बोलले असता, याबाबत आपल्याला काहीही कल्पना नसल्याचं संदीप देशपांडे यांनी ETV भारतशी बोलताना सांगितलं. दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरत सक्रिय राजकारणात प्रवेश केलाय. त्यावेळी महाराष्ट्र निर्माण सेनेने आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. यावेळी माहीम विधानसभेतील जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार असल्याचं बोललं जात असून, ठाकरे गट या जागेवर आपला उमेदवार देतो? की अमित ठाकरे बिनविरोध निवडून येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :