छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. 20 तारखेला मतदान, तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं बघायला मिळतंय. त्यातच आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. "देवेंद्र फडणवीस यांनी ओवैसी हे नाव घेतलं पण ते माझा सामना करू शकत नाहीत. तसंच फडणवीस मनोज जरांगेचं नाव का घेत नाही? त्यांचं नाव घेताना तुमची बोबडी वळते का?", असा खोचक सवालही त्यांनी केलाय.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? : 9 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्व मतदार संघाचे भाजपा उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाणा साधला. "सुन लो ओवैसी, हे छत्रपती संभाजीनगर आहे. याचं नाव आता कोणीही बदलू शकत नाही, असं सांगत हे शहर कालही भगवं होतं. आजही आहे आणि उद्याही भगवंच राहणार", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच लोकसभा निवडणुकीत सहा जागांवर व्होट जिहादचा फटका महायुतीला बसला. त्यामुळं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' या विधानाचा संदर्भ देत जर ते व्होट जिहाद करणार असतील तर आम्हालाही मतांचं धर्मयुद्ध करावंच लागेल, असं फडणवीसांनी ठणकावून सांगितलं.
फडणवीसांच्या टीकेला ओवैसीचं प्रत्युत्तर : एआयएमआयएम उमेदवारांच्या प्रचारार्थ असदुद्दीन ओवैसी यांची छत्रपती संभाजीनगरात सभा पार पडली. यावेळी ओवैसींनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. "देवेंद्र फडणवीस माझं नाव घेऊ शकतात. पण मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊ शकत नाहीत. माझं त्यांना चॅलेंज आहे की, त्यांनी ज्या पद्धतीनं माझं नाव घेतलं, त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांचंही नाव घ्यावं. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या भडकाऊ भाषणात व्होट जिहादचा उल्लेख केला. हे निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन नाही का?", असा सवाल ओवैसींनी निवडणूक आयोगाला केला. पुढं ते म्हणाले, "फडणवीसांना मालेगावमध्ये मतं न मिळाल्यामुळं त्यांनी ‘व्होट जिहाद’चा मुद्दा मांडला. पण त्यांना हे ठाऊक नाही की 1818 साली मालेगावच्या मुस्लिमांनी इंग्रजांविरुद्ध मराठ्यांसोबत लढा दिला होता. आमचे पूर्वज स्वातंत्र्य लढ्यात लढणारे होते. ते माफी मागणारे नव्हते", असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा -