मुंबई Kishori Pednekar ED Interrogation : लोकसभा निवडणूक तोंडावर असून त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशातच विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागं ईडीचा ससेमिरा लागलेला दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यापाठोपाठ आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. ईडीनं कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊत यांना चौकशीचं समन्स बजावलं आहे. या समन्सनुसार संदीप राऊतांना पुढच्या आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी आज (25 जानेवारी) किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय.
चौकशीपूर्वी काय म्हणाल्या पेडणेकर : कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी आज पुन्हा एकदा किशोरी पेडणेकरांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. यासंदर्भात प्रतिक्रिया देत पेडणेकर म्हणाल्या की, "मला असं वाटतं की ईडी आपल्या ऑफिसमध्ये बसतंय की कुणाच्या घरी? कोरोना काळातील घोटाळ्याशी माझा काडीचाही संबंध नाही. मी कुठलाही गुन्हा केला नाही", असं त्या म्हणाल्या.
रवींद्र वायकर चौकशीसाठी गैरहजर : 500 कोटींच्या भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीनं चौकशीसाठी आमदार रवींद्र वायकर यांना 17 जानेवारीला समन्स बजावून बोलावलं होतं. मात्र, त्यावेळी ते चौकशीसाठी उपस्थित राहू शकले नव्हते. त्यावेळी त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी एक महिन्यांची मुदत वाढ मागितली होती. मात्र, त्यांना मुदतवाढ न देता ईडीनं पुन्हा समन्स बजावून 23 जानेवारीला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, यावेळीही वायकर चौकशीसाठी गैरहजर राहिले.
रोहित पवारांची 11 तास चौकशी : कथित बारामती अॅग्रो घोटाळ्याप्रकरणी बुधवारी (24 जानेवारी) ईडीनं रोहित पवार यांची तब्बल 11 तास चौकशी केली. तसंच आता त्यांना पुन्हा 1 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, चौकशीनंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना रोहित पवार म्हणाले की, "दिल्ली समोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही. मी ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केलं. शरद पवारांनी अनेक युवा कार्यकर्ते उभे केले. आपला एखादा कार्यकर्ता अडचणीत आला तर ते लढणाऱ्याच्या मागं राहतात, पळणाऱ्याच्या मागं नाही".
हेही वाचा -