मुंबई Prashant Damle On Damodar Theater Demolishes : कलावंतांच्या हक्काचं व्यासपीठ असलेल्या गिरणगावातील दामोदर नाट्यगृहाचं काही महिन्यांपूर्वी पुनर्बांधणीच्या नावाखाली तोडकाम सुरू करण्यात आलं होतं. मात्र, येथे व्यवस्थापन आणि सोशल सर्व्हिस लीग अगोदर शाळा बांधण्यात येणार आहे. त्यानंतर दामोदर नाट्यगृहाचा हॉल बांधण्यात येणार, अशी माहिती समोर येताच यावर रंगकर्मी, नाट्यरसिक आणि सहकारी मनोरंजन मंडळ यांनी आक्षेप घेतला.
दामोदर नाट्यगृहाचं तोडकाम थांबवण्यात यावं, यासाठी सरकारकडं मागणी करण्यात आली. याची सरकारनं दखल घेत नाट्यगृहाचं तोडकाम थांबवलं. तसंच आचारसंहितेदरम्यान कोणतंही काम करू नये, असे आदेशही सरकारनं दिले. मात्र, आचारसंहितेमध्ये देखील नाट्यगृहाचं तोडकाम सुरू असल्याचं समजताच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी पत्रकार परिषद घेऊन नाट्यगृह वाचवण्यासाठी आपली आक्रमक भूमिका मांडली आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार : यावेळी बोलत असताना प्रशांत दामले म्हणाले की, "सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत असून राज्यातील पाचव्या आणि अंतिम टप्प्याचं मतदान 20 मे रोजी होणार आहे. त्यामुळं 21 मे पर्यंत आचारसंहिता लागू असेल. 21 मे नंतर आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आमच्या मागण्या मांडणार आहोत. मात्र, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत", असा इशारा प्रशांत दामलेंनी दिला. दामलेंच्या या निर्णयाला नाट्यरसिक, कलावंत आणि नाट्यप्रेमींनी पाठिंबा दर्शविला.
काय आहेत मागण्या?
1) दामोदर नाट्यगृहाच्या जागी बांधण्यात येणाऱ्या शाळेचं आरक्षण रद्द व्हावं.
2) नाट्यगृहाचा वाढीव FSI नाट्यगृहासाठीच वापरला जावा.
3) नाट्यगृह आणि शाळेचं बांधकाम एकाचवेळी सुरू व्हावं.
4) दामोदर नाट्यगृहाच्या काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना आणि सहकारी मनोरंजन मंडळाच्या डोअर किपर्सना पूर्वीप्रमाणेच नव्या नाट्यगृहात काम मिळावं. तोपर्यंत त्यांना पर्यायी रोजगार मिळावा.
5) नव्या दामोदर नाट्यगृहात पूर्वीप्रमाणेच सहकारी मनोरंजन मंडळाचे कार्यालय तसंच तालमीची जागा असावी. त्यासाठी प्रस्तावित आराखड्यात त्याची नोंद असावी. नव्या नाट्यगृहाचे निर्माण होईपर्यंत संस्थेस वापरण्यायोग्य पर्यायी जागा मिळावी.
हेही वाचा -