मुंबई Preeti Sharma Menon News : आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीति शर्मा मेनन यांनी आज (5 ऑगस्ट) मुंबईत माध्यमांशी संवाद साधत असताना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आम आदमी पक्ष राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक आणि मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. मुंबईतील सर्व 36 मतदारसंघासह राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी पक्षानं केली असल्याची माहिती प्रीति शर्मा मेनन यांनी दिली.
"आम आदमी पक्षाला मुंबईत पाठिंबा मिळत आहे. इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती. विधानसभेबाबत आमची कोणत्याही पक्षासोबत चर्चा झालेली नाही. मात्र, जेव्हा गरज भासेल तेव्हा भाजपाला पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्र येऊ," असंही प्रीति शर्मा मेनन यांनी स्पष्ट केलं.
राज्य सरकारवर केली टीका : यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत प्रीति शर्मा मेनन म्हणाल्या की, "एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी महाराष्ट्राला धोका दिलाय. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या तीन नेत्यांचा एकमेकांवर विश्वास नाही. त्यामुळं ते राज्यातील जनतेला काय देणार? राज्यातील सगळे प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आलेत. एकनाथ शिंदे हे जणू गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं त्यांना गुजरातला पाठवण्यास जनता सज्ज झाली आहे," असा टोलादेखील त्यांनी लगावला.
मुंबईत आमची स्वतंत्र मतपेढी- अजित पवारांबाबत बोलताना, जे स्वत:च्या काकांचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार, अशी त्यांनी खोचक टीका केली. "मुंबईतील लोकल प्रवासामध्ये दररोज 10 मृत्यू होतात. मात्र, केंद्रातील सरकारनं या महत्त्वपूर्ण बाबीवर कोणतीही उपाययोजना आखलेली नाही," अशी टीका त्यांनी केली. "मुंबईत आमची स्वतंत्र मतपेढी आहे. 2014 मध्ये मुंबईत 2 लाख 70 हजार मतं मिळाली होती. आता आपला 10 लाख मतं मिळतील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार सुरू आहेत. त्यावर "जे सत्ताधारी अंगणवाडी आणि शाळांमध्ये पैसा पोहोचवू शकले नाहीत, ते लाडकी बहीण योजनेसाठी पैसे काय पोहोचवणार?", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राला राज ठाकरेंची गरज आहे का? : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर प्रीति शर्मा मेनन यांनी पाठिंबा जाहीर केला. तसंच जातीवर आधारित जातगणना व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी जोरदार टीका केली. "महाराष्ट्राला राज ठाकरेंची गरज आहे का? ते कलाकार आहेत, कधी नायक तर कधी खलनायक बनतात," अशी टीका शर्मा यांनी केली.
तिजोरीची एकत्रितपणे लूट सुरू- "राज्यातील सत्ताधारी भाजपा विविध महापालिकांच्या निवडणुका घेण्यास घाबरत आहे. भाजपा महाराष्ट्र विरोधी आणि मुंबई विरोधी पक्ष आहे," अशी टीका त्यांनी केली. "खोके सरकारकडं लोककल्याणकारी कामासाठी वेळ नाही. राज्याच्या तिजोरीची एकत्रितपणे लूट करण्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मग्न आहेत. पुन्हा सत्तेत येणार नाही, याची खात्री असल्यानं लूट सुरू आहे, अशी घणाघाती टीका शर्मा यांनी यावेळी केली.
हेही वाचा -