मुंबई Aaditya Thackeray On Eknath Shinde : मुंबईतील आणि राज्यातील अनेक विकासकामांचं उद्घाटन करण्यास सरकार वेळकाढूपणा करतंय. तसंच त्यांच्याकडं यासाठी वेळ नसल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून आदित्य ठाकरेंच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? : याविषयी आदित्य ठाकरेंनी आज (25 फेब्रुवारी) एक्सवरुन पोस्ट शेअर केली आहे. मुंबईतील उड्डाणपुलाचा फोटो पोस्ट करत ते म्हणाले की, "डोमेस्टिक एअरपोर्ट जंक्शनवरील हा उड्डाणपूल आठवडाभरापासून पूर्णपणे तयार आहे. मात्र, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना लोकांसाठी वेळ नसल्यानं त्याचं उद्घाटन होत नाहीय. दररोज मुंबईकरांना येथे तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अशा मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाकडं हे निर्लज्ज सरकार दुर्लक्ष करत असल्याचं पाहणे, अत्यंत संतापजनक आहे."
'इगो' बाजूला ठेवून : पुढं ते म्हणाले की, "मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आव्हान करतो की, आपला 'इगो' बाजूला ठेवून एमएमआरडीएला आजच उड्डाणपूल सुरू करण्यास सांगा. त्यांना आपला 'इगो' बाजूला ठेवता येतो का पाहूया. दुसरीकडं गोखले पुलाबद्दल पालिकेचे भ्रष्ट आयुक्त सांगतात, पूल तयार आहे पण लोड चाचणीच्या प्रतीक्षेत आहे. तर स्थानिक भाजपा आमदार म्हणतात, पुलाची इतर काही कामे बाकी आहेत. लोकांची दिशाभूल करणाऱ्या आमदाराला मला अडचणीत आणायचे नाही. पण BMC चे आयुक्त फक्त घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना अर्ध्या पुलाचे उद्घाटन करण्यास कधी वेळ मिळेल, याची वाट पाहत आहेत. किती लाजिरवाणे आहे हे! भाजपा आणि मिंधे सत्ताधीश मुंबईच्या त्रासात कशी भर घालत आहेत, हे पाहण्यासाठी मी मीडिया आणि मुंबईकरांना दोन्ही पुलांना भेट देण्याचे आमंत्रण देतो! प्रश्न असा आहे, की बेकायदेशीर सीएम आपला 'इगो' बाजूला ठेवून उड्डाणपूल लोकांसाठी सुरू करणार का?", असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला होता.
उशिरा सूचललं शहाणपण : "उशिरा होत असलेल्या आणि अर्धवट तयार झालेल्या गोखले पुलाच्या उद्घाटनाचा मुद्दा आम्ही उपस्थित केल्यानंतर, आता म्हणे उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचं समजतय. आमचा दबाव कामी आला ह्याचा आनंद आहेच, पण प्रश्न असा आहे की ५ दिवसांपूर्वीच काम झालेलं असतानाही मुंबईकरांनी उद्यापर्यंत तरी का थांबावं? तसंच... जे आमदार खोटं बोलले होते की 'मॅस्टिक वर्क' बाकी आहे आणि महानगरपालिका आयुक्त खोटं बोलत होते की, लोड टेस्टिंग बाकी आहे, त्याचं काय झालं? मी केलेल्या ट्विटनंतर 12 तासांच्या आतच सगळं काम पूर्ण झालं? देशांतर्गत विमानतळाजवळच्या पुलाचं उद्घाटन कधी होणार?", असंही ते म्हणाले.
हेही वाचा -