आग्रा Agra Youth Murdered In America : आग्रा इथल्या तरुण व्यावसायिकाचा अमेरिकेतील इंडियाना इथं कार आणि ट्रकच्या अपघातानंतर ट्रकचालकानं गोळ्या मारुन खून केला. गेविन दसौर असं त्या अमेरिकेत खून झालेल्या भारतीय तरुण व्यावसायिकांचं नाव आहे. विशेष म्हणजे 17 दिवसापूर्वीच गेविन दसौर यांचं अमेरिकेत लग्न झालं होतं. पत्नी आणि ते एका पार्टीतून घरी परत येताना हा अपघात झाल्यानंतर ट्रकचालकानं त्यांचा खून केला. यानंतर गेविन दसौर यांचा अमेरिकेतच अंत्यविधी करण्यात आला. मात्र या अंत्यविधीला जाता न आल्यानं व्हिडिओ कॉलवर मुलाचा अंत्यविधी पाहण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्या पित्यावर आली. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कार आणि ट्रकच्या अपघातानंतर ट्रकचालकानं केला खून : अमेरिकन वेळेनुसार 16 जुलै रोजी रात्री 8.15 च्या सुमारास व्यावसायिक गेविन आणि त्यांची पत्नी सिंथिया झामोरा हे दोघंही पार्टीहून घरी परतत होते. वाटेत भरधाव येणारा ट्रक आणि कार यांच्यात अपघात झाला. यामुळे ट्रकचालक आणि गेविन यांच्यात वाद झाला. वाद सुरू असताना ट्रकचालकानं गेविन यांना त्यांच्या पत्नीसमोर भररस्त्यावर तीन गोळ्या झाडून मारलं. यामुळे गेविन यांचा जागीच मृत्यू झाला. या खुनाची माहिती मिळताच अमेरिकन पोलीस घटनास्थळी पोहोचले. अमेरिकन पोलिसांनी गेविन यांच्या कुटुंबाला माहिती दिली. कारचा चालक आणि ट्रकचालकाचं रस्त्यावर भांडण झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी अमेरिकन पोलिसांना सांगितलं. यानंतर ट्रकचालकानं कार चालकावर गोळ्या झाडल्या, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कुटुंबाला धक्का, केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी दिली भेट : गेविन दसौर यांच्या खुनानं त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेनंतर चालकानं तरुण व्यावसायिकाच्या डोक्यात तीन गोळ्या झाडल्या. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळताच केंद्रीय राज्यमंत्री प्रा. एसपी सिंह बघेल आणि फतेहपूर सिक्रीचे खासदार राजकुमार चहर रविवारी आग्रा इथं पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी पोहोचले. त्यांनी पीडित कुटुंबाचं सांत्वन केलं. याबाबत परराष्ट्रमंत्र्यांना माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कुटुंबाला शक्य ती सर्व मदत केली जाईल. अमेरिकन पोलिसांनी गेविन यांच्या मारेकऱ्याला काही मिनिटात सोडून दिलं. यामुळे कुटुंबीय कमालीचं दुखावलं आहे. गेविन यांचे वडील पवन दसौर यांनी "आरोपीनं आपल्या मुलाची हत्या करुन स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचं सांगितलं, ते चुकीचं आहे. मला न्याय हवा आहे," अशी मागणी त्यांनी केली.
अमेरिकेत करणार गुन्हा दाखल : "ट्रक ड्रायव्हरशी वाद झाला, त्यावेळी गेविनच्या हातात पिस्तूल होतं. मात्र, ट्रक चालकानं गोळीबार केल्याचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. त्यातच ट्रकचालकानं गोविनवर एकापाठोपाठ तीन गोळ्या झाडल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ट्रक चालकासोबत झालेल्या वादात गेविन उजव्या हाताऐवजी डाव्या हातात पिस्तूल घेतो. त्याला डाव्या हातानं गोळी मारता येत नव्हती. माझा मुलगा चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवण्यास विरोध करत होता. ट्रक चालकानं त्याच्यावर गोळी झाडली. आमच्या वकिलाचे कायदेशीर मत घेऊन आम्ही या संदर्भात अमेरिकेत खटला दाखल करू," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
इंडियानामध्ये होता वाहतूक व्यवसाय : पवन दसौर यांनी सांगितलं की, "माझा व्यवसाय असून माझी मुलगी दीपसी आणि मुलगा गेविन अमेरिकेत राहतात. मुलगी अमेरिकेत शिकली होती, तर मुलगा गेविननं आग्र्यातील सेंट जॉर्ज महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. यानंतर तो 2016 मध्ये अमेरिकेला गेला. अमेरिकेतील इंडियाना इथं त्यानं वाहतूक व्यवसाय करण्यास सुरुवात केली. मुलगा गेविननं 17 दिवसांपूर्वीच मेक्सिकोच्या सिंथिया झामोराशी लग्न केलं. त्यांच्या लग्नानं संपूर्ण कुटुंब आनंदी होतं. मुलगी दीपसीनं मुलगा गेविनच्या हत्येची माहिती दिली."
डिसेंबरमध्ये होणार होतं रिसेप्शन, आता येणार अस्थिकलश : गेविनचे वडील पवन दसौर यांनी सांगितलं की, "मुलगी दीपसीचं लग्न डिसेंबरमध्ये होणार होतं. त्यामुळे बहिणीच्या लग्नाच्या निमित्तानंच पत्नीसोबत भारतात यायचं, असं मुलानं ठरवलं होतं. त्यानंतरच त्यांचं रिसेप्शन होणार होतं. माझा मुलगा माझ्याशी रोज व्हिडिओ कॉलद्वारे बोलत असे. लग्नामुळे तो खूप खूश होता. भारतात पोहोचण्याआधीच त्याला आपला जीव गमवावा लागला. मी माझ्या मुलाचा अंत्यविधीही मोबाईलवर पाहिला. आता कुटुंबाकडं दु:खाशिवाय काहीही नाही. मुलगी दीपसी 29 जुलैला भारतात येत आहे," असंही यांनी यावेळी स्पष्ट केलं.