वॉशिंग्टन US Strike on Houthis : अमेरिका आणि ब्रिटननं शनिवारी येमेनमधील हुथी साइट्सवर लढाऊ विमानांनी हल्ले केले. यूएस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 13 वेगवेगळ्या ठिकाणांवरील एकूण 36 लक्ष्यांना टारगेट करण्यात आलं.
'या' 6 देशांचं समर्थन : या हल्ल्यानंतर अमेरिका आणि ब्रिटननं ऑस्ट्रेलिया, बहरीन, कॅनडा, डेन्मार्क, नेदरलँड आणि न्यूझीलंडसह संयुक्त निवेदन जारी केलं. निवेदनात म्हटलं आहे की, लाल समुद्रात शांतता राखणं हे आमचे उद्दिष्ट आहे, कारण तेथून जाणाऱ्या जहाजांना सतत धोक्यांचा सामना करावा लागतो. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी शनिवारी येमेनमधील हुथी बंडखोरांच्या स्थानांवर झालेल्या हल्ल्याची माहिती देताना सांगितलं की, शनिवारी अमेरिका आणि युनायटेड किंगडमच्या सैन्यानं हुथी नियंत्रित भागांवर अनेक हल्ले केले. हे हल्ले करण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनला ऑस्ट्रेलिया, बहारीन, कॅनडा, डेन्मार्क, नेदरलँड आणि न्यूझीलंड यांचंही समर्थन मिळालं आहे.
36 लक्ष्यांवर हल्ला : युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडमच्या सैन्यानं येमेनमधील हुथी बंडखोरांच्या नियंत्रणाखाली असलेल्या 13 ठिकाणी 36 लक्ष्यांवर हल्ला केला. "ही सामूहिक कारवाई हुथी बंडखोरांना स्पष्ट संदेश आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या जलमार्गांमध्ये शांतता राखणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आम्ही जगातील महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एकाचं रक्षण करण्यात कोणतीही कसूर ठेवणार नाही. या हल्ल्यांचा उद्देश इराण-समर्थित हुथी मिलिशियाच्या शक्तीला हानी पोहोचवणं हा आहे, जेणेकरून अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय जहाजांवर सातत्यानं होणारे हल्ले थांबवता येतील", असं अमेरिकेनं स्पष्ट केलं.
याआधीही हल्ला केला होता : शुक्रवारी (2 फेब्रुवारी) अमेरिकेनं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) तसेच इराक आणि सीरियामधील मिलिशियाच्या 85 हून अधिक स्थानांवर हल्ले केले होते. यामध्ये सुमारे 40 लोक मरण पावले आहेत.
हे वाचलंत का :