नवी दिल्ली/इस्लामाबाद Shehbaz Sharif Elected As Pakistan PM : शहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान म्हणून निवड झालीय. पंतप्रधान निवडण्यासाठी आज मतदान झालं. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष अयाज सादिक यांनी कुणाला किती मतं मिळाली हे जाहीर केलं. त्यामध्ये शहबाज शरीफ 201 मते मिळवून दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. पंजाबचे तीन वेळा मुख्यमंत्री असलेले शहबाज शरीफ 2022 मध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानचे पंतप्रधान झाले होते. पंतप्रधान म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ केवळ 16 महिन्यांचा राहिला.
सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान : ऑगस्ट 2023 मध्ये त्यांच्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, शहबाज शरीफ यांनी दावा केला होता की, त्यांनी पाकिस्तानला डिफॉल्टपासून वाचवलं आहे. ते पंतप्रधना झाले तेव्हा ज्या परिस्थितीत अर्थव्यवस्था होती ती खराब होती. त्यातून आम्ही देशाला बाहेर काढले. तसंच, या 16 महिन्यांच्या कार्यकाळात लोकांनी प्रेम दिलं. आता पुन्हा एकदा देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल आनंद आहे, असंही शहबाज शरीफ म्हणाले.
शहबाज शरीफ यांचा राजकीय प्रवास : माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ शहबाज शरीफ यांचा जन्म 1950 मध्ये लाहोरमध्ये झाला. शहबाज शरीफ यांची 1985 मध्ये लाहोर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. शहबाज शरीफ 1988 मध्ये पहिल्यांदा पंजाब विधानसभेचे सदस्य झाले. 1997 मध्ये ते तिसऱ्यांदा पंजाब विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर ते पंजाबचे मुख्यमंत्रीही झाले.
तीन वेळा पंजाबचे मुख्यमंत्री : 1999 मध्ये लष्करी उठावात त्यांची हकालपट्टी करण्यात आली आणि सौदी अरेबियात निर्वासित करण्यात आलं. 8 वर्षे वनवास भोगून 2007 मध्ये ते पाकिस्तानात परतले. 2008 मध्ये त्यांनी भाकरमधून विधानसभेची जागा चौथ्यांदा जिंकली आणि दुसऱ्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री झाले. 2013 मध्ये ते पुन्हा एकदा लाहोरमधून विधानसभेचे सदस्य झाले आणि तिसऱ्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. 2018 मध्ये, त्यांचा मोठा भाऊ नवाझ शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवल्यानंतर त्यांची पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
हेही वाचा :
1 हिदूर जंगलातील चकमकीत नक्षलवादी ठार, बस्तर फायटरच्या जवानाला वीरमरण
2 बिल्किस बानो प्रकरण : सुटका रद्द केल्यानं दोषींची सर्वोच्च न्यायालयात धाव
3 शेतकरी आंदोलनाची आज ठरणार रणनीती, शंभू-खनौरी सीमेवर ट्रॅक्टरच्या संख्येत वाढ