हैदराबाद Remedies To Remove Blackheads : प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असं मनापासून वाटतं. पण आपल्या सौंदर्यात सर्वाधिक विरजन घालणारं कुणी असेल तर ते म्हणजे चेहऱ्यावर येणारे ब्लॅक आणि व्हाइट हेड्स. त्यांना चेहऱ्यावरून हटवण्यासाठी कॅास्मेटिक बाजारात नाना तऱ्हेची सौंदर्य प्रसाधनं उपलब्ध आहेत. मात्र, त्यामुळे केवळ क्षणीक समाधान मिळतं. एवढेच नाही तर प्रयोगशाळेत तयार होणारे हे कॅास्मेटिक्स रसायनांनी युक्त असतात. ज्यामुळे त्याचा त्वचेवर अपाय होण्याची दाट शक्यता असते. अशात ही ब्लॅक आणि व्हाइट हेड्स घालवण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय उपलब्ध आहेत. ज्याबाबत आपणास माहिती नसल्यामुळे ते आपण वापरत नाही. म्हणून या हेड्सशी लढण्यासाठी आम्ही तुम्हाला देत आहोत काही खास घरगुती टिप्स.
ब्लॅक असो वा व्हाइट हे दोन्ही हेड्स सौदर्यांमध्ये बाधा निर्माण करतात. प्रदूषणामुळे आपल्या त्वचेवर धूळ साचते जी त्वचेवर चिकटून राहते. हवेच्या संपर्कात आल्यास या धुळीचे ऑक्सिडायझेशन होवून ब्लॅकहेड्स तयार होतात.
गरम पाण्याची वाफ : नाकाच्यावर ब्लॅकहेड्स असलेल्यांनी आठवड्यातून दोन ते तीनवेळा गरम पाण्याची वाफ घ्यावी. असं केल्यानं त्वचेची छिद्रं उघडतात आणि त्यातील धुलीकण बाहेर टाकण्यास मदत होते.
बेकिंग सोडा : ब्लॅकहेड्सची समस्या दूर करण्यासाठी सोड्याचा वापर फायदेशीर आहे. एका वाटीत पाणी घेऊन त्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करा. त्यापासून पेस्ट तयार होईल. ही पेस्ट चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावा. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या. पंधरा दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.
मध आणि दालचिनी पावडर : दालचिनी पावडर आणि मध समान प्रमाणात मिसळून त्याची पेस्ट तयार करा. नंतर मास्कप्रमाणे नाकावर लावा. 10-15 मिनिटांनी कोमट पाण्यानं धुवा. असं केल्यास चांगले परिणाम मिळतात.
ऍपल सायडर व्हिनेगर : एका लहान भांड्यात पाणी आणि सफरचंद सायडर व्हिनेगर सम प्रमाणात घ्या. कापसाच्या बोळ्याच्या सहाय्यानं या मिश्रणाचं नाकावर मसाज करा. ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्याचा हा एक चांगला उपाय आहे.
साखर-लिंबाचा रस : एका भांड्यात लिंबू पिळून त्यात दोन चमचे साखर घाला. मिश्रण चांगलं मिसळा आणि नाकाला लावा. असं केल्यास ब्लॅकहेड्सची समस्या लवकर कमी होईल असं तज्ञांचं म्हणणं आहे. 2010 मध्ये 'जर्नल ऑफ कॉस्मेटिक डर्मेटोलॉजी' मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, संशोधकांना असं आढळून आलं की, लिंबू-साखर रसाचं मिश्रण नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी फायदेशी आहे. कोरियातील सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिन, त्वचाविज्ञान विभागाचे डॉ. ह्यून जोंग ली ( Hyun Jong Lee ) यांनी या संशोधनात सहभाग नोंदवला होता.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )