मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या अनेक बोलभाषा आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी बोली भाषा बोलणाऱ्या समूहांनी मराठीच्या भाषा सौंदर्यात मोठं योगदान दिलंय. यातील एक अनमोल दागिना म्हणजे मालवणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ परिसारात बोलली जाणारी ही भाषा थोड्या फार फरकानं संपूर्ण कोकणात बोलली जाते. दर १२ कोसांवर भाषा बदलते, असं म्हणतात त्या उक्तीनुसार कणकवली, देवगड, वेंगुर्ला, मालवण, आचरे, बांदा परिसरांतील मालवणी रहिवासी यांची बोली थोडी वेगळी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही मालवणीचा मोठा प्रभाव आहे. एकंदरीत कोकणात बोलली जाणाऱ्या भाषेला कोकणी म्हटलं जात असलं तर या कोकणीतील एक रसाळ भाषा म्हणजे 'मालवणी'. याच मालवणीला विनोदी मराठी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक मच्छिंद्र कांबळी यांनी चारी मुलखात आणि पार साता समुद्रापार लोकप्रिय केलं. त्यांनी मालवणी बोली मराठी रंगभूमीच्या मुख्य प्रवाहात आणली. 4 एप्रिल हा मच्छिंद्र कांबळी यांचा जन्मदिन 'मालवणी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो.
मालवणी भाषा ही विनोदासाठी सर्वोत्तम मानली जाते. यात एक उपहास आहे, ती मार्मिक आहे, तिच्यात कमालीचा बेरकीपणा आणि अर्थातच कल्पनेपलीकडचं माधुर्य आहे. इथली माणसं अतिशय साधेपणानं राहणारी पण मायाळू. काहीवेळा वरुन फणसासारखी काटेरी वाटणारी ही माणसं वरुन शहाळ्यासारखी टणक पण आतून फणसाच्या गऱ्यासारखी रसाळ आणि गोड आहेत. एखाद्या गरीबाच्या घरात जरी कोणी पाहुणा आला तरी तो म्हणतो, "येवा पावण्यानुं, इलास? बसा. बसतलाच तर डाळी असा, जेवतंलास तर पेज असा, ऱ्हवतलास तर सांज झाली, जातंलास तर सकाळ आसा, चाफ्या पारता वाट आसा." म्हणजे थांबणार असाल तर बसायला देतो, जेवायला पेज का असेना पण देतो, राहून सकाळी जाणार असाल तर जाताना चाफ्याच्या झाडाकडून जायाला वाट आहे. म्हणजे जाणाऱ्याची वाटही कशी सुगंधित, आहे याची जाणीव तो करुन देतो.
मालवणी माणसाच्या इथल्या इरसाल शिव्या, अस्सल म्हणी भाषेचं वेगळेपण दाखवणाऱ्या आहेत. मालवणी भाषेतील कथा, कादंबऱ्या, नाटक असं साहित्यही खूप समृद्ध आहे. कुठल्याही साहित्यामध्ये किंवा नाटकात भाषा जितकी खुमासदार असेल तितके त्यातील रंजकता वाढते. मालवणी भाषेतील विनोदी नाटकं फार गाजली, उत्तम उदाहरणं म्हणजे 'वस्त्रहरण', 'घास रे रामा', 'येवा कोकण आपलाच आसा' सारखी काही नाटकं... गंगाराम गवाणकर यांनी लिहिलेली 'वस्त्रहरण' हे मालवणी भाषेतील नाटक. याचे 5400 प्रयोग झाले. या नाटकात महाभारताची टिंगल केली आहे असा आक्षेप घेऊन हे नाटक बंद पाडायचे प्रयत्न झाला होता. मात्र पु.ल. देशपांडे यांनी हे नाटक पाहिलं, प्रेक्षकांनाही आवर्जून पाहण्यास सांगितलं आणि नाटकाला उचलून धरल्यामुळे हे नाटक चालू राहिलं. पु लं ना तर या नाटकात छोटीशी भूमिका करायचीही इच्छाही होती. ती त्यांनी बाबूजी म्हणजे मच्छिंद्र कांबळी यांच्याकडे बोलूनही दाखवली होती.
कोकणी माणूस मालवणी पांघरुन जगत असतो. त्याच्या अंतरंगातही मालवणी असते. या भाषेत आगळा जिव्हाळा आहे. 3000 वर्षापूर्वीपासून लिखित स्वरुपात मालवणी भाषा उपलब्ध आहे. संत नामदेवांनी लिहिलेली पंचभाषेची गौळण त्यात मालवणी गौळणीच्या चार ओळी ऐकायला मिळतात. "पाव गा दातारा तू नंदाचो झिलो, माका फडको दे मी हिवानं मेलो...घे माझो कोयतो, देवा पाया पडतो" अशा मालवणी भाषेतील शब्दांचा वापर संत नामदेवांनी आपल्या रचनेत केल्याचं पाहायला मिळतं. ज्ञानेश्वरीमध्येही मालवणी भाषेतील अनेक शब्द पाहायला मिळतात.
मालवणी भाषा ही मुळातच एक उत्तम लय असलेली नादमय भाषा आहे. मालवणीत लिहिणारे वि. कृ. नेरुरकर हे मालवणीतले पहिले कवी म्हणून ओळखले जातात. साहित्यक्षेत्रातला सर्वोच्च सन्मान 'ज्ञानपीठ पुरस्कारा'चे मानकरी ठरलेले विंदा करंदीकर हे याच मातीतून मोठे झालेले साहित्यिक, मधु मंगेश कर्णिक, मंगेश पाडगावकर, चि. त्र्यं. खानोलकर, श्री. ना. पेंडसे, वसंत सावंत, आ. ना. पेडणेकर, प्र. श्री. नेरुरकर, यासारख्या दिग्गज मालवणी साहित्यिकांनी मराठी भाषेत मोलाचं योगदान दिलं आहे. महेश केळुस्कर, अनिल धाकू कांबळी, दादा मडकईकर, ना. शि. परब, मनोहर कदम, प्रवीण बांदेकर, उषा परब, रघु बंधु अशी कवी आणि साहित्यिकांची मोठी यादी तयार होईल. वेंगुर्ल्यात जन्मलेल्या मधुसूदन कालेलकर यांचं यंदा जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मराठी, हिंदी मिळून 110 केलं. 70 पेक्षा जास्त चित्रपट गीते आणि 30 पेक्षा जास्त नाटकं त्यांनी लिहिली आहेत. कोकणातून येऊन मराठीला समृद्ध करणाऱ्या प्रतिभावान साहित्यिकांची, कलाकारांची ही परंपरा अशीच पुढे चालत रहावी यासाठी 'जागतिक मालवणी दिना'च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मालवणी आणि मालवण्यावर प्रेम करा आणि मालवणी जगवणाऱ्या कोकण नावाच्या स्वर्गाला अवकळा येऊ देऊ नका.
एका जबरदस्त प्रतिभेच्या मालवणी कलावंत, निर्मात्याचा वाढदिवस 'मालवणी भाषा दिन' म्हणून साजरा होत असल्याचा त्यांच्या चाहत्यांना अभिमान वाटतो. मग तो दिवंगत मच्छिंद्र कांबळी म्हणजेच बाबूजींच्या मुलाला नाही वाटणार? 'भद्रकाली प्रॉडक्शन'चे निर्माता आणि मच्छिंद्र कांबळी यांचे चिरंजीव नवनाथ उर्फ प्रसाद कांबळी यांनी ईटीव्ही भारतशी याबाबत बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
"बाबांचा जन्मदिवस हा 'मालवणी भाषा दिन' म्हणून साजरा होतो याचा सार्थ अभिमान वाटतो. मालवणातील रेवंडी सारख्या छोट्या गावात जन्मलेला एक मुलगा, लहानपणीचं वडीलांचं छत्र हरपल्यानंतर अशिक्षीत असतानाही आईनं वाढवलं. मालवणात आणि मुंबईत येऊन मिळेल ती काम करत त्यांनी शिक्षण घेतलं. त्यांना नावलौकिक वस्त्रहरण नाटकामुळे मिळालं हे जरी खरं असलं तरी अगोदर हे नाटक स्वतः गवाणकर काका आणि राजा मयेकरांसारख्या लोकांनी केलं होतं. 1980 च्या दशकात त्यांनी हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचं धाडस त्यांनी केलं. गिरणी कामगार आणि मालवणी कलाकारांच्या सहभागातून त्यांनी हे नाटक रंगभूमीवर आणलं. सुरुवातीला मालवणी भाषा ऐकून लोक नाक मुरडायचे. ही भाषा बोलणारा कोणी चाकरमानीही ही भाषा बोलताना टाळायचा प्रयत्न करत असे, अशा काळात त्यांनी हे नाटक प्रमाणित भाषेच्या मुख्य प्रवाहातील प्रेक्षकांसमोर सादर केलं." - नवनाथ उर्फ प्रसाद कांबळी
साहित्यिकाच्या जन्मदिनी भाषादिन साजरा होण्याची परंपरा असताना नाट्य कलावंताच्या जन्मदिन 'मालवणी भाषा दिन' साजरा होता याबद्दलचं आश्चर्य आणि अभिमान वाटत असल्याचं सांगताना प्रसाद कांबळी पुढं म्हणाले,
"मालवणी भाषेबद्दलचा अभिमान त्यांनी कायम बाळगला. 'वस्त्रहरण' नाटकाच्या यशामुळे आणि लोकप्रियतेमुळे या भाषेला सन्मान मिळू लागला. त्यानंतर मालवणी खानावळी, गझालीसारखी हॉटेल्स, मालवणी जत्रोत्सव, सिंधुदुर्ग उत्सवाचे आयोजन, मालवणी स्नेहसंमेलनं अशा नव्या उपक्रमांना सुरुवात झाली. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली सारख्या ठिकाणी विखुरलेला मालवणी माणूस अशा उत्सवाच्या निमित्तानं एकत्र येऊ लागला. याचं मोठं श्रेय बाबांनी सादर केलेल्या 'वस्त्रहरण' आणि इतर मालवणी भाषेतील नाटकांना जातं. मालवणी भाषेतील 25 नाटकांची त्यांनी निर्मिती केली. कोकणापासून विदर्भापर्यंत आणि अगदी परदेशातही मालवणी भाषेची ही नाटकं पाहायला मालवणीसह मराठी भाषिक रसिकांनी गर्दी केली. एका बोलभाषेचं वेड लावण्यात त्यांना यश मिळालं. आपल्याकडे 27 फेब्रुवारी हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कुसुमाग्रजांच्या नावे 'मराठी भाषा अभिमान दिन' म्हणून साजरा होतो. परंतु एखाद्या बोलीभाषेचा दिवस साहित्यिकाच्या नव्हे तर नाट्य कलावंताच्या जन्मदिनी सुरू होत असेल तर तो फक्त बाबूजींच्या म्हणजे मच्छिंद्र कांबळींच्या नावे साजरा होतो. बाबांनी या भाषेचा प्रचार आणि प्रचार केला, त्यांचा जन्मदिन हा 'मालवणी भाषा दिन' म्हणून ओळखला जातो याचा खरंच अभिमान आहे." - नवनाथ उर्फ प्रसाद कांबळी
बा देवा म्हाराजा, सर्वांचा भला कर, हित कर आणि सर्वांका सुखात ठेव. मालवणी माणसाच्या यशाचो झेंडो कायम फडकत ठेव. मालवणी भाषा अशीच बहरत रवान दे रे, म्हाराजा. होय म्हाराजा.
हेही वाचा -
"सहकलाकारांचा आदर राखा, चंकू नाही चंद्रकांत कुलकर्णी म्हणा..." राज ठाकरेंचा मराठी कलाकारांना सल्ला
मराठी भाषा दिन : देश विदेशातील मराठी जनांना मायबोलीचे धडे देणारी अनोखी शाळा