हैदराबाद Brain Tumor Removed Through Eyelid : हैदराबादमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी (एआयजी) येथील डॉक्टरांना मोठं यश मिळालं आहे. ब्रेन ट्यूमरची दुर्मीळ गाठ काढण्यासाठी येथे एक अनोखी आणि यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर हैदराबादमधील 54 वर्षीय महिलेला नवजीवन मिळालं आहे.
कवटी न कापता आणि न उघडता शस्त्रक्रिया : एआयजी रुग्णालयाच्या न्यूरोसर्जिकल टीमनं कवटी न कापता आणि न उघडता मेंदूतील गाठ काढून एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली. डॉक्टरांनी अत्यंत नाविन्यपूर्ण प्रक्रियेद्वारे 54 वर्षीय महिलेच्या मेंदूतील ब्रेन ट्यूमर यशस्वीरित्या काढला. या प्रक्रियेमध्ये, न्यूरोसर्जन न्यूरो-एंडोस्कोप वापरून डोळ्याभोवती लहान आणि काळजीपूर्वक बनवलेल्या पॅसेजद्वारे मेंदूतील गाठ काढून टाकली जाते.
सहा महिन्यांपासून त्रास : 54 वर्षीय महिलेवर ही दुर्मीळ शस्त्रक्रिया करण्यात आली. महिलेला गेल्या सहा महिन्यांपासून अंधुक दिसत होतं आणि उजव्या डोळ्यात वेदना होत होत्या. प्राथमिक उपचार करूनही अंधुक दृष्टी आणि वेदना कायम राहिल्यानंतर तिनं एआयजी हॉस्पिटलची मदत घेतली. वरिष्ठ सल्लागार न्यूरो सर्जन डॉ. अभिचंद्र गब्बिता, न्यूरो सर्जरीचे संचालक डॉ. सुभोद्राजू आणि नेत्रतज्ज्ञांच्या टीमनं महिलेची तपासणी केली.
तपासणी दरम्यान महिला रुग्णाला स्पिनो ऑर्बिटल मेनिंगिओमा (SOM) ट्यूमर असल्याचं निदर्शनास आलं. कवटीच्या जंक्शनवर आणि डोळ्याच्या मागील बाजूस 2 सेमी ट्यूमर असल्याचं स्पष्ट झालं. स्फेनॉइड विंग मेनिन्जिओमा हे सहसा सौम्य आणि हळू-वाढणारे ट्यूमर असतात. स्फेनोइड विंगच्या बाजूने हे ट्यूमर ऑप्टिक मज्जातंतू, ऑक्युलोमोटर मज्जातंतू, कॅव्हर्नस सायनस किंवा अंतर्गत कॅरोटीड धमनीमध्ये शिरकाव करतात.
नेत्रदीपक पद्धतीने शस्त्रक्रिया : मेंदूची कवटी कापून किंवा उघडून शस्त्रक्रिया केली गेली, तर ती काही वेळा धोकादायक ठरू शकते. महिलेच्या कवटीला इजा न करता मेंदूतील गाठ काढून डॉक्टरांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एआयजी डॉक्टरांच्या पथकाने एंडोस्कोपिक लॅटरल ट्रान्सॉर्बिटल पद्धतीद्वारे शस्त्रक्रिया केली. ट्यूमर काढण्याची ही पद्धत चांगली आणि कमी धोकादायक आहे. या पद्धतीद्वारे मेंदूमधील गाठ पापणीच्या मार्गे यशस्वीरित्या काढण्यात आली. यामुळे कवटीचे कोणतेही नुकसान होत नाही तसंच मेंदूवर थेट दबाव पडत नाही. या पद्धतीमुळे मेंदूवरील ताण लक्षणीयरित्या कमी होतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
स्त्रीला फक्त दोन दिवसांनी डिस्चार्ज : शस्त्रक्रियेची प्रक्रिया कमी जोखमीची असल्यानं, शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन दिवसांनी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. मेंदूतील जखमही लवकर बरी होत असल्यानं हे साध्य झालं, असं डॉक्टरांनी सांगितलं.
हेही वाचा