मुंबई : मनोरंजन क्षेत्रासाठी हे वर्ष धमाकेदार ठरलं आहे. बॉक्स ऑफिसवर सीक्वेल चित्रपटांनी रेकॉर्ड मोडले आहेत. तर दुसरीकडे अनेक आश्चर्यकारक कॅमिओनं प्रेक्षकांना चकित केलंय. दरवर्षीप्रमाणे यंदाही जुन्या गाण्यांचे रिमेक व्हर्जन तयार करण्यात आले आहे. यामधील काही रिमेक गाणी स्फोटक ठरली आहेत. याशिवाय काही गाण्यांना प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. 'चोली के पीछे', 'मेरे मेहबूब मेरे सनम' आणि 'सजना वे सजना' या गाण्यांच्या रिमेकनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही रिमेक गाण्यांची यादी घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन मजेदार बनवू शकाल.
'सजना वे सजना' : करीना कपूर स्टारर 'चमेली' चित्रपटातील 'सजना वे सजना' हे त्या काळातील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक होतं. गायक सुनिधी चौहानच्या आवाजातील हे आजही खूप पसंत केलं जातं. यावर्षी जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या गाण्याचा रिमेक बनवण्यात आला आहे. यामध्ये शहनाज गिलला कास्ट करण्यात आलंय. हे गाणं देखील खूप धमाकेदार आहे.
'चोली के पीछे' : 'खलनायक' चित्रपटातील 'चोली के पीछे' हे गाणं त्यावेळी खूप गाजलं होतं. या गाण्यातील माधुरी दीक्षितचा डान्स अनेकांना पसंत पडला होता. आता या गाण्याच्या रिक्रिएट व्हर्जनमध्ये करीनाला कास्ट करण्यात आलं होतं. हे गाणं यावर्षी रिलीज झालेल्या 'क्रू' या चित्रपटामधील आहे. 'क्रू'मध्ये तिच्याबरोबर क्रिती सॅनोन आणि तब्बू मुख्य भूमिकेत आहेत.
'आज की रात' : 'स्त्री 2' या चित्रपटामधील 'आज की रात' एका गझलचे रिक्रिएट व्हर्जन असल्याचं खुद्द गायकांनीच उघड केलं होतं. सचिन-जिगर यांनी या गाण्याबद्दल, आपण या गाण्याला तबल्याच्या तालावर गझल वर्जनमध्ये गाऊ शकतो, असं म्हटलं होतं. हे गाणं तमन्ना भाटियासाठी कोरिओग्राफ केलं गेलं आहे. या गाण्यातीला तिचा डान्स चाहत्यांना खूप आवडला.
'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' : अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन स्टारर चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाचं शीर्षक एका गाण्यावर बेतलं आहे. त्याच शीर्षकावर या चित्रपटामधील एक गाणंही तयार करण्यात आलं आहे. ते राघवनं गायलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय. 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'चं मूळ गाणं देखील खूप लोकप्रिय आहे.
'अंखियां दे कोल' : क्रिती सेनॉन आणि काजोल अभिनीत 'दो पत्ती'चे 'आंखियां दे कोल' हे गाणं पंजाबी लोकगीताचा रिमेक आहे, ज्यात मूळ गाणं रेश्मानं गायलं आहे. या गाण्याचा रिमेक शिल्पा रावनं गायलं आहे. हे गाणं देखील प्रेक्षकांना खूप आवडलं आहे.
'मेरे महबूब मेरे सनम' : विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क स्टारर 'बॅड न्यूज'मध्ये नवीन बीटसह रिक्रिएट केले गेलेले 'मेरे महबूब मेरे सनम', हे गाणं देखील यावर्षी लोकप्रिय झालं. अनु मलिक, जावेद, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी मूळ आवृत्तीला आवाज दिला होता. पुनर्निर्मित आवृत्तीमध्ये मूळ गायक देखील आहेत, परंतु डीजे चेतसनं स्वतः याला सुंदर बीट जोडले आहेत.