जयपूर - अभिनेत्री विद्या बालन 17 वर्षांनंतर 'भूल भुलैया' फ्रँचायझीमध्ये परतली आहे. यामुळे तिला आनंद झाल्याचं तिच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट होतंय. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी जयपूरमध्ये बोलताना तिनं याबद्दलचा खुलासा केला.
जयपूरच्या राज मंदिर या प्रतिष्ठित थिएटरमध्ये आज 'भूल भुलैया 3'चा ट्रेलर लॉन्च पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकार कार्तिक आर्यन, निर्माता भूषण कुमारसह अभिनेत्री विद्या बालन उपस्थित होती. यावेळी तिनं 'भूल भुलैया' कुटुंबात पुन्हा सामील झाल्याबद्दलचा आनंद व्यक्त केला.
"'भूल भुलैया 3' परत आणल्याबद्दल अनीस जी, मी तुमची खूप खूप आभारी आहे. 17 वर्षांनंतर 'भूल भुलैया'मध्ये परत आल्याबद्दल मी रोमांचित झाले आहे. गेल्या 17 वर्षात मला या चित्रपटासाठी खूप प्रेम मिळाले आहे आणि मी या चित्रपटात पुन्हा भेटणार आहे. पुढील 17 वर्षांतही हे प्रेम असं वाढत राहो", असं विद्या बालन म्हणाली.
2007 मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैया' चित्रपटात विद्या बालननं 'मंजूलिका'ची भूमिका साकारली होती. त्यावेळी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. यामध्ये अक्षय कुमार आणि अमिषा पटेल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात, विद्या बालन माधुरी दीक्षित नेने, कार्तिक आर्यन आणि तृप्ती दिमरी यांच्यासह तिची प्रसिद्ध भूमिका पुन्हा साकारणार आहे.
'भुल भुलैया 2' च्या जबरदस्त यशानंतर 'भूल भुलैया 3' चे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केलंय. चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांनी टी सिरीज आणि सिने 1 स्टुडिओच्या बॅनरखाली केली आहे. कार्तिक आर्यन याच्यासह, या चित्रपटात विद्या बालन, तृप्ती दिमरी, माधुरी दीक्षित आणि राजपाल यादव यांचा समावेश आहे. 'भूल भुलैया 3' 1 नोव्हेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीच्या मल्टीस्टारर 'सिंघम अगेन' चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर टक्कर देणार आहे.