मुंबई - सौदी अरेबियात होणाऱ्या रेड सी फिल्म फेस्टीव्हलमध्ये रीमा कागती यांनी दिग्दर्शित केलेला 'सुपरबॉय ऑफ मालेगाव' या चित्रपटाची वर्णी लागली आहे. रेड सी स्पर्धा विभागात या चित्रपटाची निवड झाली आहे. हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 5 डिसेंबर 2024 पासून लाल समुद्राच्या पूर्वेकडील जेद्दाह येथे सुरू होणार असून 14 डिसेंबर रोजी त्याची सांगता होणार आहे.
रेड सी फिल्म फेस्टिव्हलच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे. रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या चौथ्या आवृत्तीत रेड सी स्पर्धेतील आशिया, आफ्रिका आणि अरब जगतातील बोल्ड सिनेमांचे प्रदर्शन पाहायला मिळेल. यामध्ये 'सुपरबॉय ऑफ मालेगाव' ची निवड झाल्यानं चित्रपटाच्या टीमचं कौतुक होत आहे. हा चित्रपट रेड सी स्पर्धेतील सर्वोच्च पारितोषिकासाठी इच्छुक असलेल्या 16 चित्रपटांपैकी एक आहे.
महाराष्ट्रातील मालेगाव या छोट्याशा शहरातील हा चित्रपट नासिर शेखच्या वास्तविक जीवन कथेवर आधारित आहे. 'सुपरबॉय ऑफ मालेगाव'ची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंट आणि टायगर बेबी करत असून, रितेश सिधवानी, फरहान अख्तर, झोया अख्तर आणि रीमा कागती निर्माते आहेत. याचे दिग्दर्शन रीमा कागतीने केले असून वरुण ग्रोव्हरने पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात आदर्श गौरव, विनीत कुमार सिंग आणि शशांक अरोरा यांच्या मुख्य भूमिका आहेत.
एक मजेदार आणि हृदयस्पर्शी कथा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नासिर आणि मालेगावमध्ये राहणाऱ्या त्याच्या खास मित्रांच्या ग्रुपच्या आयुष्यात घेऊन जातो. या छोट्या शहरात स्वप्ने मोठी आहेत, अंतःकरण आनंदाने भरलेलं आहे आणि सर्वकाही शक्य आहे असं दिसतं. नसिरचं चित्रपट बनवण्याचं स्वप्न सत्यात उतरेल का आणि त्याच्या सभोवतालच्या लोकांचे जीवन बदलू शकेल का याचं उत्तर या चित्रपटात सापडणार आहे.
'सुपरबॉयज ऑफ मालेगाव'चा वर्ल्ड प्रीमियर 13 सप्टेंबर रोजी टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF) मध्ये पार पडला आहे. 10 ऑक्टोबर रोजी बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्येही तो दाखवला गेला होता. हा चित्रपट जानेवारी 2025 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर, ते प्राइम व्हिडिओवर भारतात आणि जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल.