मुंबई - बॉलिवूडमध्ये आशयघन मराठी चित्रपटांची नेहमीच चर्चा होत असते. या सिनेसृष्टीमधील अनेक मंडळी मराठी चित्रपटसृष्टीबरोबर जुळली गेली आहेत. साजिद नाडियादवाला आणि त्यांची निर्मितीसंस्था नाडियादवाला ग्रँडसन यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. साजिद नाडियाडवाला यांची पत्नी वर्दा नाडियादवाला जोफिएल एन्टरप्रायजेस या बॅनरखाली मराठी चित्रपट बनविणार असून त्यांनी मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या सह्याद्री फिल्म बरोबर हातमिळवणी केली आहे. साजिद नाडियादवाला यांच्या ‘नाडियाडवाला ग्रॅंडसन' मार्फत या चित्रपटाची प्रस्तुती केली जाणार आहे.
तेजस्विनी पंडितने आपले मत व्यक्त करताना सांगितले की ही नवीन भागीदारी आशयसमृद्ध असलेली कथानके सादर करण्याच्या उद्देशाने जमून आली आहे आणि त्यातून मराठी संस्कृती आणि वारशाचे दर्शन होईल. उत्तम कथानके, सर्वोत्तम आशय आणि चांगली कलाकृती यासाठी दोन्ही निर्मितीसंस्था कटिबद्ध असतील, तसेच प्रेक्षकांना अद्वितीय चित्रकलाकृती अनुभवायला मिळेल. ती पुढे म्हणाली की, "साजिद नाडियाडवाला आणि वर्दा नाडियाडवाला यांच्याबरोबरील भागीदारी करता येणे हा मी माझ्या टीमचा सन्मान समजते. मराठी कलाकार उत्तमोत्तम कलाकृती देत आले आहेत आणि त्याला आता भव्यतेची झालर मिळेल. तसेच मार्केटिंगसाठी देखील नाडियाडवालांचा उपयोग होऊ शकतो. ही भागीदारी मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहराच बदलून टाकणारी असेल याची खात्री वाटतेय."
निर्मात्या वर्दा नाडियाडवाला म्हणाल्या की, "आमची कर्मभूमी मुंबई असून आमच्यावर महाराष्ट्रीयन संस्कार आहेत. या मातीशी आम्हीही काही देणं लागतो. त्यामुळे आम्ही मराठी चित्रपट निर्मितीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. तेजस्विनी पंडित यांच्याबरोबर युती केल्यामुळे आम्हाला नावीन्यपूर्ण, परिणामकारक कथा असलेले चित्रपट सादर करता येतील याची खात्री वाटतेय. या नवीन वाटचालीसाठी जोफिएल एन्टरप्रायजेसला सह्याद्री फिल्मबरोबर एकत्र येताना खूप आनंद होत आहे. मराठी प्रेक्षकांची साथ मिळेल अशी आशा आणि खात्री आहे."
नाडियादवाला ग्रँडसन या हिंदीतील मोठ्या बॅनरसह हातमिळवणी केल्याने सुंदर आशय असलेल्या चित्रपट निर्मितीला चालना देण्याची जबाबदारी तेजस्विनीच्या बॅनरवर आली आहे. या युतीचा पहिला चित्रपट कोणता असेल याकडे आता लक्ष लागून राहील. नाडियादवाला ग्रँडसनमुळे मराठी चित्रपट सर्वदूर पोहोचवणे तेजस्विनीला अधिक मदतकारक होऊ शकेल.
हेही वाचा -