मुंबई - Operation Valentine : वरुण तेजची भूमिका असलेल्या 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटाची टीम 14 फेब्रुवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील लेथपोरा कॅम्प येथील पुलवामा स्मारक स्थळाला भेट देणार आहे. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्याला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या दिवशी एका आत्मघाती बॉम्बरने आयईडीने भरलेल्या वाहनाला घेऊन जाणाऱ्या सुरक्षा ताफ्यावर हल्ला केल्याने 40 शूर भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते.
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. एकाचवेळी 40 भारतीय सैनिकांना या दहशतवादी हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला होता. या दिवसाचे स्मरण करण्यासाठी आणि वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटाची टीम पुलवामा स्मारक स्थळाला भेट देईल.
'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' या चित्रपटाबद्दल बोलायचं तर हवाई दलातील वीरांच्या शौर्य आणि पराक्रमाभोवती याचे कथानक गुंफण्यात आलंय. देशाचे रक्षण करताना हवाई दलातील सैनिक कशा प्रकारच्या आव्हांनाचा मुकाबला करतात आणि देशाच्या सीमा सुरक्षित ठेवतात याचे थरारक चित्रण यात पाहायला मिळेल. सत्य घटनांपासून प्रेरित 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन'चे दिग्दर्शन शक्ती प्रताप सिंग हाडा यांनी केले आहे.
या चित्रपटात अभिनेता वरुण तेज एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत आहे. निर्मात्यांनी नुकतेच 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' च्या टीझरचे लॉन्चिंग केले होते. हा टीझर आवडल्याने प्रेक्षकांनी चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले होते. हिंदी आणि तेलुगू अशा दोन भाषांमध्ये चित्रीत झालेला हा चित्रपट १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे चित्रपटाचे प्रदर्शन काही काळासाठी लांबणीवर टाकण्यात आलं होतं. अखेर 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' हा चित्रपट १ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' एक बहुप्रतिक्षित देशभक्तीपर थ्रिलर चित्रपट आहे. साऊथ स्टार वरुण तेज आणि माजी मिस वर्ल्ड विजेती सौंदर्यवती अभिनेत्री मानुषी छिल्लर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट शौर्याची एक वेगळी गाथा प्रेक्षकांच्या समोर उलगडणार आहे. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री रुहानी शर्मा सामील झाली आहे. या चित्रपटात ती तान्या शर्मा हे पात्र साकारत असून भारतीय वायुसेना विभागाची लढाऊ सदस्य म्हणून ती शत्रूशी लढताना दिसेल.
हेही वाचा -