मुंबई - Gurucharan Singh Sodhi Back To Home : प्रसिद्ध टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा गुरुचरण सिंग अनेक आठवड्यांपासून बेपत्ता होता. दिल्ली पोलिसांनी त्याच्या बेपत्ता झाल्याचा गुन्हाही नोंदवला होता, याअंतर्गत त्याचा शोध देखील सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो आता आपल्या घरी परतला असून तो इतके दिवस कुठे आणि कसा होता याबद्दल देखील सांगितलं आहे. गुरुचरण हा 22 एप्रिलपासून गायब होता. तो बेपत्ता झाल्यानंतर टीव्ही जगतात काळजीचं वातावरण पसरले होते. तो सुखरुप परतल्यानं त्याच्या कुटुंबीयांसह प्रेक्षकांचाही जीव भांड्यात पडला आहे.
रोशन सिंग सोढी साकारणारा गुरुचरण सिंग सापडला : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरणनं चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांना सांगितलं की, त्याला आपले घर सोडून धार्मिक यात्रेला जायचं होतं, असा विचार करून त्यानं घर सोडलं होतं. दरम्यान तो अमृतसर, लुधियानासह अनेक ठिकाणी गुरुद्वारांमध्ये राहिला आणि जेव्हा त्याला परतावं असं वाटलं, तेव्हा तो परतला. 22 एप्रिल रोजी गुरुचरण हा दिल्लीहून मुंबईला जाण्यासाठी विमानात बसणार होता, मात्र तो फ्लाइटमध्ये चढला नाही आणि बेपत्ता झाला. गुरुचरणचा फोन हा 24 एप्रिलपर्यंत सक्रिय होता. यानंतर त्याच्या फोनवरून अनेक व्यवहार झाल्याचं देखील समोर आलं होतं. ज्या दिवशी तो बेपत्ता झाला, त्याच दिवशी तो बॅग घेऊन जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला होता.
गुरुचरण सिंग काही दिवसांपूर्वी झाला होता बेपत्ता : गुरुचरणचे वडील हरजीत सिंग यांनी 26 एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, गुरुचरणची आर्थिक स्थिती चांगली नाही आणि त्यांच्यावर अनेक कर्जेही थकीत आहेत, त्यामुळे तो बेपत्ता झाला. आता गुरुचरण सिंग घरी आला असून याप्रकरणी पोलीस आणखी चौकशी करणार आहेत. दरम्यान गुरुचरणनं 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो 2020 रोजी सोडला होता. यावेळी त्याच्या वडिलांची तब्येत ठीक नसल्यानं त्यानं हा निर्णय घेतला होता. याशिवाय 'तारक मेहता का उल्टा चष्मा' निर्माता असित मोदीकडे त्याचे काही थकबाकी असल्याचं यापूर्वी सांगण्यात आलं होत.
हेही वाचा :