हैदराबाद - पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या गाण्याचा कॉन्सर्टचा देशात दौरा सुरू आहे. दिल्ली, जयपूर शहरात मिळालेल्या अफाट प्रतिसादानंतर त्याचा कार्यक्रम हैदराबादमध्ये पार पडला होता. त्याच्या शोला परवानगी देताना तेलंगणा सरकरानं त्याला 'दारु' या विषयावरील गाणी न गाण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी नाईलाजानं त्याला ''तैनू तेरी दारु छ पसंद आ लेमोंडे'' हे त्याचं लोकप्रिय गाणं गाता आला नव्हतं. परंतु प्रेक्षकांनाही त्यानं नाराज न करता याच गाण्यातील लिरीक्समध्ये 'दारु' ऐवजी 'कोक' हा शब्द वापरुन हे गाणं गायल्यानंतर त्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. या पार्श्वभूमीवर त्याचा नुकताच अहदाबादमध्ये भव्य कॉन्सर्ट पार पडला. यावेळी दिलजीत दोसांझनं प्रेक्षकांशी संवाद साधताना 'दारु' या विषयावर जोरदार भाषण केलं. ज्या दिवशी दारुची दुकानं बंद होतील, देशातील सर्व राज्य सरकारं ड्राय स्टेटची घोषणा करतील तेव्हा दिलजीत दोसांझ आयुष्यभर कधीच दारुवर गाणं तयार करणार नाही किंवा गाणारही नाही, असं तो म्हणाला.
अहमदाबाद कॉन्सर्टमध्ये दिलजीत दोसांझनं दारुवर केलेलं भाष्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या व्हिडिओत तो म्हणतो, "एक आनंदाची बातमी आहे. आज मला कोणतीही नोटीस आली नाही. ( प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद ) यापेक्षाही आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे आजही मी 'दारु'वर कोणतंच गाणं गाणार नाही. तुम्ही विचाराल की का नाही गाणार? तर कारण आहे की गुजरात 'ड्राय स्टेट' आहे.
"मी आजापर्यंत डझनाभरापेक्षाही जास्त भक्तीगीतं गायली आहेत, गेल्या 10 दिवसात मी दोन भक्तीगीतं तयार केली आहेत. त्याची कोणीच चर्चा करत नाही. परंतु टीव्हीवर बसून 'पटियाला पॅक'चीच चर्चा करतात. एक अँकरसाब म्हणत होते की, 'एकादा अभिनेता असं जर म्हणाला तर त्याला तुम्ही बदनाम कराल, पण अशी गाणी गाणाऱ्या गायकाला तुम्ही प्रसिद्ध करत आहेत. 'भाई मै अलग से किसे को फोन कर के नही बोल रहा हूँ, की पटियाला पॅक लगाया की नहीं.' मी फक्त गाणं गातोय. बॉलिवूडमध्ये अशी हजोरा गाणी 'दारु'वर तयार झाली आहेत. माझी केवळ 2-4 गाणी असतील, परंतु मी तीही गाणार नाही. कारण मी स्वतः दारु पीत नाही. पण बॉलिवूडचे हे सेलेब्रिटी आहेत जे दारुची खुलेआम जाहीरात करत असतात. मी तसं करत नाही. उगंच माझी 'कळ' काढू नका. मी शांतपणे येऊन कार्यक्रम करुन जातो. आपण इतके लोक इथं जमलो आहोत, तर एक चळवळ सुरू करु शकतो. आपल्या देशात जेवढीही राज्य आहेत त्यांनी 'ड्राय स्टेट' जाहीर करावीत. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आयुष्यभर हा दिलजीत दोसांझ दारुवर गायचं बंद करेल. काय हे शक्य आहे. ( प्रेक्षकांनी प्रतिसाद देताना जोरदारपणे 'नाही' असं म्हटलं.)"
कोरोनामध्ये सर्व बंद होतं पण दारुची दुकानं बंद नव्हती याची आठवणही दिलजीतनं यावेळी करुन दिली. ''यापुढं माझे जिथे शो आहेत तिथं तो दिवस ड्राय डे घोषीत करा मी दारुची गाणी गाणार नाही,'' असं तो म्हणाला.
दिलजीत दोसांझचा 'दिल लुमिनाटी टूर' देशभर सुरू आहे. आतापर्यंत झालेल्यादेशातील प्रमुख शहरातील चारही शोमध्ये हजारोंच्या संख्येनं प्रेक्षक हजर राहिले होते. त्याच्या प्रत्येक गाण्यावर लोक ताल धरुन नाचताना दिसतात. त्याचे पुढील कॉन्सर्ट मुंबई, कोलकाता, इंदूर, पुणे आणि गुवाहाटी येथे होणार आहेत. त्यावेळीही त्याला राज्य सरकारांकडून नोटीस मिळू शकतात. यापर्श्वभूमीवर त्यानं राज्य सरकारांना माझी कळ काढू नका, मी गप्प गाणी गाऊन निघून जातो, पण तुमच्यात हिंमत असेल तर 'ड्राय स्टेट' करा किंवा माझा शो ज्यादिवशी आहे तो दिवस 'ड्राय डे' घोषित करण्याचं आव्हानंच राज्य सरकारांना दिलं आहे.