मुंबई Sachin Pilgaonkar Ram Bhajan : अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, देशभरात सर्वत्र राममय वातावरण आहे. देशातील अनेक भागात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतंय. या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी एक भजन गायलं. 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत करताना त्यांनी या भक्तीमय भजनाचा प्रवास उलगडून सांगितला. प्रभू रामाचं हे भजन गाताना मला खूप आनंद झाला, असं सचिन पिळगावकर म्हणाले.
सुखद अनुभव : "जेव्हा माझ्याकडे प्रभू रामाचं भजन गाण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा आपसूकचं माझ्या तोंडून होकार आला. याला नकार देण्याचा प्रश्नचं नव्हता. मी लहानपणापासून रामाचा भक्त राहिलो आहे. त्यामुळे ही चौपाई गाताना, त्याचं शूटिंग करताना मला एक सुखद अनुभव आणि एक वेगळंच समाधान मिळालं. मला आशा आहे की, रामभक्त या चौपाईचं स्वागत करून त्यावर प्रेम करतील", असं सचिन पिळगावकर म्हणाले.
रामासमोर बसून गाण्याचा अनुभव आला : या भजनात व्हिडिओ फॉरमॅटच्या 14 चौपाई असून, 24 ऑडिओ चौपाई आहेत. हे भजन गाताना, मला समोर प्रत्यक्ष प्रभू राम बसले असून मी त्यांच्यासमोर गातोय, असा अनुभव आल्याचं सचिन पिळगावकर यांनी सांगितलं. विशेष म्हणजे सचिन पिळगावकर यांच्या या भजनावर चाहत्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत असून, हे भजन अत्यंत मधुर आणि वातावरण प्रसन्न करणारं असल्याचं राम भक्त म्हणतायेत.
सचिन पिळगावकर आणखी भक्ती गीतं गातील का? : सचिन पिळगावकर यांनी आतापर्यंत अनेक गाणी गायली असली तरी, त्यांनी भक्ती गीतं फारशी गायली नाहीत. त्यामुळे भविष्यात जर मला संधी मिळाली, तर मी निश्चितचं भक्तीगीतं गाईन, असं ते यावेळी म्हणाले. "हा राम भक्तीचा जो जागर होतोय, हा उत्साह जो पसरतोय, यामध्ये देशातील प्रत्येकानं सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावा", असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
हे वाचलंत का :