मुंबई - Richa Chadha and Ali Fazal : बॉलिवूडमधून पुन्हा एकदा आनंदाची बातमी येत आहे. यावेळी बॉलिवूडचे सुंदर कपल अली फजल आणि रिचा चढ्ढा हे पालक झाले आहेत. रिचानं मुलीला जन्म दिला आहे. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी 16 जुलै रोजी त्यांच्या मुलीच्या जन्माची गुड न्यूज दिली होती. यावेळी जोडप्यानं त्यांच्या कुटुंबीयांचं आणि चाहत्याचे आभार मानले होते. अली फझलनं एका संवादादरम्यान कन्या घरी आल्याची खुशखबर दिली होती. आता अली आणि रिचानं इंस्टाग्रामवर एक खास नोट शेअर केली आहे. "16 जुलै रोजी आमच्या घरी एका मुलीचा जन्म झाला, ज्याचा आनंद मोजता येणार नाही. आमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे आम्ही तुम्हा सर्वांचे आभारी आहोत, अली फजल आणि रिचा चढ्ढा यांचे प्रेम."
अली फजल आणि रिचा चढ्ढाचं लग्न : यापूर्वी 14 जुलै रोजी रिचा चड्ढानं एक पोस्ट शेअर करत लिहिलं होत की, "सध्या आराम नाही, खूप काही सहन करत आहे, मला सध्या खूप वेगळे वाटत आहे, ती सतत हालचाल करत आहे." यानंतर अनेकांनी या पोस्टवर तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान अली आणि रिचा यांनी 2020 मध्ये स्पेशल मॅरेज कोर्टात गुपचूप लग्न केलं आणि त्यानंतर 2022 मध्ये या जोडप्यानं मोठ्या थाटामाटात सर्व रितीरिवाजांसह लग्न केलं. या जोडप्याचं लग्न खूप जास्त चर्चेत होत. अलीबरोबर लग्न केल्यानंतर अनेकांनी रिचाला ट्रोल केलं होतं.
वर्कफ्रंट : दरम्यान या जोडप्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रिचा शेवटी संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी: डायमंड बाजार' या वेब सीरीजमध्ये दिसली होती. ही वेब सीरीज खूप हिट झाली. या वेब सीरीजमध्ये रिचा लज्जोच्या भूमिकेत दिसली होती. 'हीरामंडी'मध्ये रिचाबरोबर शेखर सुमन, अध्यायन सुमन, फरदीन खान, शर्मीन सहगल, , मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी आणि संजीदा शेख हे कलाकार दिसले होते. दुसरीकडे अली हा 5 जुलै रोजी प्राइम व्हिडिओवर रिलीज झालेल्या क्राइम सीरिज 'मिर्झापूर 3' मध्ये दिसला आहे. सध्या ही वेब सीरीज खूप चर्चेत आहे.