डिंपल कपाडियाने 1973 मध्ये बॉबी या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. तिच्या आकर्षक आणि निरागस रूपानं प्रेक्षकांना भुरळ घातली आणि तिच्या स्टाइलनं, विशेषतः तिच्या पोल्का-डॉटेड ब्लाउजनं चाहत्यांमध्ये फॅशनची क्रेझ निर्माण केली. डिंपलनं सांगितलं की, चित्रपटाचे दिग्दर्शक, दिग्गज राज कपूर यांनी तिचे सर्व पोशाख परदेशातून आयात करून तिचा लूक अतिशय बारकाईनं तयार केला होता.
“मला त्याकाळातला असा कोणताही दिग्दर्शक आठवत नाही जो त्याच्या चित्रपटातील नायिकेच्या दिसण्याबद्दल इतकी काळजी घेत असेल... तिचे केस कसे असतील, तिचे कपडे कसे असतील...याबाबतीत त्यांचं वर्णन करायचं झालं तर आवारा हा एकच शब्द त्यांच्यासाठी पूर्ण लागू होतो. माझ्या लूकबद्दल सर्व काही त्यांनी डिझाइन केलं होतं... ते अविश्वसनीय होते... एक माणूस म्हणून त्यांनी हे केलं होतं. त्यांच्याकडे खूप दूरदृष्टी होती आणि या सगळ्यावरून त्यांची चित्रपटसृष्टीबद्दलची ओढ दिसून आली. बॉबी हा आयकॉनिक चित्रपट आहे. ही एक तरुण्याची प्रेमकथा आहे आणि काळाच्या पुढची कथा आहे. इंडस्ट्रीमध्ये माझ्या लॉन्चसाठी मी याहून दुसरं काहीही मागू शकले नसते,” असं राज कपूर यांच्या शताब्दीनिमित्त ईटीव्ही भारतशी खास चॅटमध्ये बोलताना डिंपल कपाडिया म्हणाली.
“फक्त बॉबी नाही, तर त्यांचे सर्वच चित्रपट अप्रतिम आहेत. राज साब यांच्याकडे नातेसंबंध, वास्तविक परस्परसंबंध समजून घेण्याची मोठी क्षमता होती आणि ते अतिशय सुंदरपणे हाताळत होतं. त्यांची नाटकाची जाण वेगळ्या पातळीवरची होती आणि त्यांची बारीक तपशीलवार नजर पूर्णपणे वेगळी होती,”असं डिंपल कपाडिया पुढे म्हणाली.
डिंपल कपाडिया बॉबी चित्रपटाच्यावेळी किशोरवयीन असतानाही ती दिग्गजांबरोबर काम करत होती पण तिला कधीच असं वाटलं नाही की, तिला कदाचित सिनेमा समजत नाही किंवा त्या कोवळ्या वयात एखाद्याच्या निर्मितीमध्ये काय घडू शकतं. “मी नवीन होते, 13 वर्षांची होते आणि तरीही ते मला बसवून स्वतः हार्मोनियमवर गाणी वाजवायचे. मला गाण्यातील बारकावे, त्याचे महत्त्व आणि भावना समजावून सांगायचे. खरंतर त्यांना हे सर्व करण्याची गरज नव्हती, परंतु ते त्यांच्या कलाकारांवर बराच वेळ घालवण्यावर विश्वास ठेवत होते. त्यांची त्यांच्या कलाकारांवरचं प्रेम आणि तळमळ जबरदस्त होती, ते तुम्हाला इतक्या उंच शिखरावर पोहोचवायचे की तुम्हाला तिथं स्थिरपणे न डगमगता थांबावं लागायचं. ते खूप प्रोत्साहन द्यायचे.", असं डिंपल म्हणाली.
" राज कपूर साब प्रत्येक गोष्ट स्वतः करुन दाखवायचे. त्यांनी दाखवलेल्यापैकी तुम्ही साठ टक्के जरी केलं तरी ते पुरेसं असायचं. केवळ सीनंच नाही तर पात्रांनी जसं बोलायचं असतं तसंच तो सेटवर बोलायचे. बॉबीनंतर मी अनेक चांगल्या दिग्दर्शकांसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण त्यांच्यासारखा दिग्दर्शक मला कधीच भेटला नाही,” असं ती म्हणाली.
मेरा नाम जोकर या चित्रपटात राज कपूरला असिस्ट करायला सुरुवात करणारा राहुल रवैल यांनी सांगितलं की ते एक उत्कट संगीतकार होते. “राज साबंना देवाकडून एक आगळी भेट मिळाली होती, ते जे वाद्य पाहतील आणि ते लगेच वाजवायचे. त्याकाळी नुकतेच इलेक्ट्रिकल कीबोर्ड आले होते...आम्ही कल आज और कलच्या पार्श्वसंगीतावर काम करत होतो...ते रेकॉर्डिंगसाठी आले होते, तेव्हा त्यांना या नवीन वाद्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती आणि एका मिनिटात त्यांनी ते वाजवूनही दाखवलं," राहुल रवैल यांनी सांगितलं.
राज कपूरचा मुलगा ऋषी कपूर यानंही बॉबीमध्ये प्रमुख नायक म्हणून पदार्पण केलं होतं. त्याबद्दल डिंपल कपाडिया म्हणाली की त्यांना मिळालेली वागणूक समान होती. “ते सर्वांशी समान वागायचे. खरं तर, त्यांनी त्यांच्या मुलापेक्षा माझ्यावर जास्त वेळ घालवला असावा. ऋषी आधीच एक हुशार अभिनेता होता त्यामुळे त्याची गरज नव्हती आणि त्यांनी माझ्यावर खूप काम केले. त्या वेळी, मी ज्या वयात होते, हे काम किती महत्त्वाचं आहे हे समजू शकत नव्हते, माझ्यासाठी मात्र ते पिकनिकसारखे होते,” असं डिंपल म्हणाली.
सेटवर राज कपूर यांचा दरारा होता यांच्या अनेक कथा आहेत आणि त्यांचे अभिनेते आणि क्रू मेंबर्सना त्यांची भीती वाटत होती. असं असलं तरी डिंपल कपाडिया सुदैवी होती कारण तिला कधीही त्यांच्या रागाचा सामना करावा लागला नाही.“ते अजिबात कडक नव्हते. आम्ही शेअर केलेलं हे एक चांगलं नातं होतं. अर्थात, मला भीती वाटली कारण हा माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता पण घाबरण्यापेक्षा मला त्यांची आदरयुक्त भीती वाटत होती. ते लार्जर दॅन लाइफ होते,” ज्येष्ठ अभिनेत्री म्हणते.
लव्ह स्टोरी, बेताब, अर्जुन, डकैत आणि अंजाम यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राहुल रवैल यांनी राज कपूर या दिग्गज चित्रपट निर्मात्याची एक अतिशय विचित्र सवय सांगितली. “ते एखाद्या शॉटवर खूश नसले तर ते त्या कालाकारावर ओरडायचे किंवा रागवायचे नाहीत. त्या कालाकारावर ते छान वागायचे, बोलायचे मात्र त्यांच्या सहाय्यक दिग्दर्शकावर भडकायचे. खरंतर हे समोरच्याला कळण्यासाठी असायचं. पण त्यांचा मुलगा ऋषी याला ते थेट सांगायचे पण इतर कलाकारांशी ते खूप छान वागायचे," राहुल रवैल यांनी सांगितलं.
बॉबीच्या सेटवरील एका घटनेचं वर्णन करताना, राहुल रवैल म्हणतात, “अभिनेता प्रेम नाथ यांनी बॉबीमध्ये ती प्रतिष्ठित भूमिका साकारण्यापूर्वी जॉनी मेरा नाम चित्रपटाच्या यशावर ते स्वार झाले होते. प्रेम नाथ हे अतिशय कडक स्वभावाचे होते. राज साब जेव्हा एखादा सीन दिग्दर्शित करत असत तेव्हा मी त्यांच्या अगदी जवळ बसायचो जेणेकरुन जे काही सूचना दिल्या जातील त्या मला पकडता येतील. प्रेमनाथ प्रत्येक शॉटनंतर उत्साहित व्हायचे आणि राज कपूर ओरडायचे, ‘व्हाट अ शॉट! फँटास्टिक!’ सेटवर सगळे टाळ्या वाजवू लागले की राज साबही टाळ्या वाजवायचे. पण एके दिवशी जेव्हा राज साब प्रेमनाथच्या शॉटवर खूश नव्हते, तेव्हा ते अचानक माझ्याकडे वळले आणि विचारले, 'राहुल, तू काय म्हणालास?' पण मी काहीच बोललो नव्हतो. मी गोंधळून गेलो होतो. त्याने माझ्या कानात काहीतरी कुजबुजले आणि मग ते प्रेमनाथकडे वळून म्हणाले, ‘आणखी एक टेक घ्या कारण राहुलला हा टेक आवडला नाही’. मी दोघांमध्ये अडकलो. यानंतर प्रेम नाथ राज साबंना म्हणाले की, "तू त्या मुन्सीपाल्टी लोकांचं का ऐकतोस ?" ते सहाय्यक दिग्दर्शकांना मुन्सीपाल्टीचे लोक म्हणायचे. राज साब यांनी प्रेम नाथ यांना आणखी एक टेक देण्यास सांगितले, 'माझा असिस्टंट शॉटवर फारसा खूश नसल्यामुळे आम्ही हा टेक आणखी एकदा करू शकतो'. पुढे, राहुल रावेल राज कपूर यांना बॉबी, सत्यम शिवम सुंदरम आणि धरम करममध्ये मदत करण्यासाठी गेले होते. त्याविषयी बोलताना राहुल रवैल म्हणाले, “बेताब रिलीज झाल्यानंतरही मी प्रेम रोगच्या सेटवर गेलो. मी त्या चित्रपटाच्या सहाय्यकांबरोबर राहिलो. सेटवर जे काही घडत होते ते मी आत्मसात केलं आणि आताही जेव्हा मी त्यांचे चित्रपट पाहतो तेव्हा मला खूप काही शिकायला मिळते.”
नो एंट्री आणि भूल भुलैया फेम दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी राज कपूर यांच्याबरोबर अगदी किशोरवयीन असताना प्रेम रोग चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शनांचं काम केलं. राज कपूर यांच्याबद्दल जे राहुल रवैल यांनी सांगितलं त्याच्या बरोबर उलट अनीस यांनी राज कपूर यांचं वर्णन केलं. “राज साबनां माहित होतं की त्यांनी त्यांच्या कलाकारांना जरी शिव्या दिल्या तरी त्यांना वाईट वाटणार नाही. त्यांना ते परवडत होतं. चित्रपट बनवताना त्यांनी कोणाला काय आणि किती सांगायचं आहे याचा फारसा हिशेब ठेवला नाही. ते त्यांच्या कामाबद्दल खूप प्रामाणिक होते आणि त्यांचे कलाकार राज कपूर चिडू नयेत या विचारानं तणावात असंत. मग ते ऋषी असो किंवा त्यांचा धाकटा मुलगा चिंपू , राजीव असे किंवा पद्मिनी असो आम्ही सर्वजण त्यांचा खूप आदर करत असू पण ते आमच्यावर रागावू नयेत ही भीती आमच्या मनात होती. त्याच्याबरोबर काम करताना ही संमिश्र भावना असायची,” असं बज्मी यांनी सांगितलं.
राज कपूर कधी रागवले होते का असे विचारले असता अनीस बज्मी म्हणाले, “हो, अनेक वेळा. एकदा, मी काही चूक केली, आणि मला सांगण्यात आलं की मी त्यांच्याबरोबर विमानात प्रवास करु शकणार नाही. तर मी मुंबई ते म्हैसूर हा प्रवास लाईट्स घेऊन जाणाऱ्या जोंगानं (ट्रक सारखं वाहन) इतर सहाय्यकांसह करणार आहे. सेटवर त्यांची एक दहशत होती पण त्याच वेळी ते आमच्यावर प्रेम करत असत. आम्हाला अनेकदा शाही वागणूक देण्यात आली. ते एक खवय्या होते आणि आमचे जेवणही हॉटेल ताजमधून यायचं आणि किमान 15 डिशेस असायच्या. ते माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी मी फक्त वडापाव खायचो आणि पहिल्यांदाच त्यांच्याबरोबर मी शिंपले आणि लॉबस्टर अशी डिश पाहिली. जेव्हा आम्ही इतर दिग्दर्शकांच्या सहाय्यकांना भेटायचो तेव्हा आम्हाला खूप खास वाटायचं. अशा शेकडो घटना आहेत जेव्हा ते रागावले आणि ओरडले होते. पण आज मला वाटते की ते सर्व त्याचे आशीर्वाद होते. आम्ही नशीबवान आहोत की आम्ही त्यांच्याबरोबर काम करताना शिकलो, बाकीचे त्यांचे चित्रपट पाहून शिकले. त्यांचे चित्रपट हे पाठ्यपुस्तकांसारखे असतात. त्यांचा प्रत्येक चित्रपट पाहिल्यावर एक नवा दृष्टीकोन मिळतो. त्यांना प्रेक्षकांची नाडी माहीत होती.”