मुंबई - शाहरुख खान आज आपला 59 वा वाढदिवस साजरा करत असताना अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सनेत्याच्या 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील एक आयकॉनिक सीन शेअर केला आहे. या दृष्यातून शाहरुखच्या व्यक्तीरेखेचा अमाप उत्साह आणि खोलवर असलेल्या भावना यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे,
'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील या दृश्यामध्ये रायचंद हवेलीमध्ये दिवाळीचा सण उत्साहात साजरा होताना दिसतो. दिवाळी निमित्त पै पाहुणे, मित्र परिवार यांचा गोतावळा जमलेला असताना जया बच्चन हिचे डोळे मात्र लेकाच्या आगमानकडे लागलेले आहेत. हे पाहून अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावरही हलकेसे हसू आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून उतरुन धावत हवेलीत जाणाऱ्या शाहरुखचा नाट्यमय प्रवेश यामुळे वातावरण भारावून जातं. आईच्या भूमिकेत असलेली जया बच्चन हातामध्ये पंचारती घेऊन लेकाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली दिसते. जया बच्चन प्रवेशद्वाराजवळ येताच, शाहरुख येईपर्यंत तिच्या डोळ्यात शंका चमकत राहते. खेळकर शाहरुख त्याच्या मंद स्मित हास्यासह प्रवेश करताना आईला म्हणतो, "ये माँ मेरे आने से पहिले हमेशा तुझे कैसे पता चल जाता है." त्यानंतर आनंदाश्रूसह आईच्या भूमिकेतील जया बच्चन शाहरुखं औक्षण करते.
अकादमीनं पोस्टमध्ये पुढे लिहिले की, "हा शाहरुखचा सर्वोत्तम एन्ट्री सीन आहे का?" या पोस्टने चाहत्यांमध्ये भरपूर उत्साह पाहायला मिळाला आहे. असंख्य प्रतिक्रियांचा वर्षाव या पोस्टवर जगभरातून होत आहे. " शाहरुख हा जगातील सर्वात मोठा सुपरस्टार." असल्याच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक करण जोहरनेही ही पोस्ट शेअर करत, "या पोस्टमुळे मला हसू फुटले.," असं म्हटलंय.
सुमारे 23 वर्षापूर्वी 2001 मध्ये रिलीज झालेला, 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात काजोल, हृतिक रोशन, करीना कपूर आणि राणी मुखर्जी यांसारख्या कलाकारांचा समावेश होता. हा चित्रपट भारतीय स्टार-स्टडेड क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो.
शाहरुख खान सध्या 'किंग' या क्राईम ड्रामा चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच त्याची मुलगी सुहानाबरोबर स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे.
बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खाननं 1989 मध्ये 'फौजी' या टीव्ही मालिकेतून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर 'दीवाना', 'डर' आणि 'बाजीगर' सारख्या हिट चित्रपटांनी त्यांची फिल्मी कारकीर्द गगनाला भिडली. परंतु, 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटानं खऱ्या अर्थानं त्याला सुपरस्टार म्हणून दर्जा प्राप्त झाला. प्रदीर्घ विश्रांतीनंतर शाहरुखनं 'पठान', 'जवान' आणि 'डंकी' सारख्या ब्लॉकबस्टरसह जोरदार पुनरागमन केलं आहे आणि बॉलिवूडचा बादशाह आपणच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय.