मुंबई - Mufasa The Lion King Hindi Version: जगभरात डिस्नेच्या ॲनिमेटेड चित्रपटांची क्रेझ खूप जास्त आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द लायन किंग' या चित्रपटाचा प्रीक्वल 'मुफासा: द लायन किंग' हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर इंग्रजीमध्ये प्रदर्शित करण्यात आला, जो जगभरातील लाखो लोकांनी पाहिला. हा ट्रेलर अनेकांना आवडला होता. यानंतर या चित्रपटाचा हिंदी ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे, हिंदी भाषिक प्रेक्षकांना हा ट्रेलर खूप आवडला आहे. शाहरुख खान आणि त्याचा मोठा मुलगा आर्यन खान यांनी डिस्नेच्या बहुप्रतीक्षित प्रीक्वल 'मुफासा: द लायन किंग'च्या हिंदी आवृत्तीतमध्ये आपला आवाज दिला आहे.
हिंदी व्हर्जन ट्रेलर : 'मुफासा: द लायन किंग'चा हिंदी व्हर्जन ट्रेलर सोमवार, 12 ऑगस्ट रोजी रिलीज झाला असून हिंदी ट्रेलरमध्ये शाहरुख खान मुफासा आणि सिम्बा या पात्रांच्या रूपात परतला असल्याचा दिसत आहे. त्याचबरोबर 'किंग खान'चा धाकटा मुलगा अबरामही या चित्रपटातून चित्रपटविश्वात पदार्पण करत आहे. वॉल्ट डिस्ने स्टुडिओज इंडियानं सोशल मीडियावर 'मुफासा: द लायन किंग'चा हिंदी व्हर्जन ट्रेलर रिलीज केल्यानंतर हा ट्रेलर सध्या खूप चर्चेत आला आहे. दरम्यान हा ट्रेलर शेअर करताना शाहरुख खान पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "जंगलचा एकच राजा असेल. आर्यन खान आणि अबराम खानबरोबर शाहरुख किंग मुफासाच्या रुपात परतला आहे. 'मुफासा: द लायन किंग' 20 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये."
काय आहे 'मुफासा: द लायन किंग'च्या ट्रेलरमध्ये? : 'मुफासा: द लायन किंग', फ्लॅशबॅकमध्ये सांगितल्या गेलेल्या कहाणीत, मुफासाची ओळख एका अनाथ सिंहाच्या रूपात करण्यात आली आहे, जो हरवलेला आणि एकटा आहे. त्याला राजघराण्याचा वारस असलेल्या टाका नावाचा सह्रदय सिंह भेटतो. काही नाती रक्तानं बनतात तर काही परिस्थितीमुळे बनतात. मुफासा आणि स्कार नावाचा राजकुमार यांच्यातही असंच नाते आहे. नशिबानं दोघे भाऊ होतात. त्यांच्या नात्याच्या कसोटीची झलक चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. ते धोकादायक आणि प्राणघातक शत्रूपासून वाचण्यासाठी एकत्र काम करतात. डिस्ने इंडियानं 'मुफासा' या बहुप्रतीक्षित मनोरंजक चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी उत्कृष्ट व्हॉइस कास्टिंग आणलं आहे.
'मुफासा: द लायन किंग' बद्दल : चाहत्यांना खूश करण्यासाठी या चित्रपटात अनेक प्रतिभावान स्टारकास्ट आहेत. या चित्रपटात पुरस्कार विजेते गीतकार लिन-मॅन्युएल मिरांडा देखील आहेत, त्यांनीच चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत. मार्क मॅनसिना आणि मिरांडा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 20 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.