मुंबई - प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांचं निधन झालं. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 73 वर्षांचे होते. हृदयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकारांमध्ये उस्ताद झाकीर हुसेन यांची गणना केली जाते. यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांनी फक्त भारतातच नाही तर आपल्या तबला वादनाच्या ताकदीवर संपूर्ण जगाला वेड लावलं. पण, तुम्हाला माहिती आहे का? ज्या तबल्यातून उस्ताद झाकीर हुसेन यांचे सूर बाहेर येतात तो तबला बनवणारा एक मराठी माणूस आहे.
उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनानं संपूर्ण संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. अशाच एका व्यक्तीलाही त्यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. ती व्यक्ती म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन यांचे तबले बनवणारे हरिदास व्हटकर. हरिदास व्हटकर सांगतात की, "मी झाकीर हुसेन यांच्यासाठी तबला बनवला. त्यांनी माझे आयुष्य घडवलं. माझ्या सर्वात लोकप्रिय ग्राहकाचं निधन हे माझ्यासाठी मोठे नुकसान आहे." भावूक झालेल्या हरिदास यांनी सांगितलं की, "मी प्रथम त्यांचे वडील अल्ला रखा यांच्यासाठी तबला बनवला होता. त्यानंतर 1998 पासून झाकीर हुसेन यांच्यासाठी तबला बनवत आहे."
हरिदास व्हटकर यांनी कांजूरमार्ग येथील कार्यशाळेत ईटीव्हीशी बोलताना सांगितलं की, "उस्ताद झाकीर हुसेन यांच्याशी माझी शेवटची भेट याच वर्षी ऑगस्टमध्ये मुंबईत झाली होती. गुरुपौर्णिमेचा दिवस होता. मी त्यांना एका हॉलमध्ये भेटलो. दुसऱ्या दिवशी मी नेपियन सी रोडजवळील सिमला हाऊस कोऑपरेटिव्ह सोसायटीत त्यांच्या घरी गेलो. तिथं मी बराच वेळ त्याच्याशी बोललो." हरिदास यांनी सांगितले की, "त्यांना केव्हा आणि कोणत्या प्रकारचा तबला हवा आहे, या बाबत ते खूप गंभीर असायचे. वाद्याच्या स्वरांबाबत ते अत्यंत गंभीर असायचे."
हरिदास व्हटकर यांनी सांगितले की, "दोन दशकांमध्ये मी झाकीर हुसेन यांच्यासाठी असंख्य तबले बनवले. माझ्याकडे असे अनेक तबले आहेत जे त्यांनी माझ्यासाठी सोडले आहेत. मी त्यांच्यासाठी नवनवीन तबले बनवत असे. ते त्यांच्या संग्रहातील तबले देखील दुरुस्त करुन घ्यायचे. मी झाकीर हुसेन यांच्यासाठी तबले बनवले यातून झाकीर हुसेन यांनी माझे आयुष्य घडवले. मी अनेकदा त्यांच्या घरी गेलो आहे. पण त्यांनी मला कधीही परक्या सारखी वागाकुक दिली नाही," अशी प्रतिक्रिया व्हटकर यांनी दिली आहे.