भारतीय चित्रपटसृष्टीचे 'भारत कुमार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोज कुमार यांचा 24 जुलै हा जन्मदिन आहे. आज ते वयाच्या 87 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. भारताचे सुपुत्र म्हणूनही लौकिक असलेल्या मनोज यांनी सामाजिक आणि देशप्रेमावर आधारित असंख्य चित्रपटांची निर्मिती केली आणि सिनेविश्वात एक नवी वाट चोखाळली. भारत कुमार, भारताचा सुपुत्र अशी त्यांची ओळख असली तरी त्याचं मूळ नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असं आहे.
हरिकृष्ण गिरी गोस्वामी बनले मनोज कुमार!! -
भारत आणि पाकिस्तान यांच्यात फाळणी झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय भारतात आले. आपल्या विद्यार्थी दशेत ते तत्कालिन लोकप्रिय अभिनेता दिलीप कुमार आणि अशोक कुमार यांच्या प्रेमात होते. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी दिलीप कुमार यांचा 'शबनम' हा चित्रपट पाहिला आणि त्यातील व्यक्तिरेखेमुळे प्रभावित होऊन त्यांनी आपलं नाव मनोज कुमार असं ठेवलं. याच नावानं त्यांनी पुढच्या काळात सुमारे पन्नासहून अधिक चित्रपटात अभिनय केला आणि चित्रपटांची निर्मितीही केली. देशप्रेमानं भारवून गेलेल्या तरुणाची भूमिका त्यांनी आपल्या चित्रपटातून साकारल्या.
उपकार चित्रपटाच्या निर्मिती मागची प्रेरणा -
ब्रिटीशांच्या जोखडातून स्वतंत्र झालेल्या भारतासमोर विकासाची मोठी आव्हान उभी होती. देशातील सर्व घटकांनी समाजातील मागासलेपण दूर करण्यासाठी, आर्थिक घडी बसवण्यासाठी पुढं याव आणि देशनिमितीच्या कार्यात सहभागी व्हाव असं आवाहन जवाहर लाल नेहरु यांच्यानंतर देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री करत होते. शास्त्रींनी देशाला 'जय जवान, जय किसान'चा नारा 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान दिला होता. 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शहीद' चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी मनोज कुमार दिल्लीत गेले होते. दिल्लीत याच काळात मनोज कुमार यांनी लाल बहादूर शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीत लाल बहादूर शास्त्री यांनी मनोज कुमार यांना सांगितले की, तुम्ही लष्कर आणि सुरक्षेवर चित्रपट बनवत आहात. पण सैनिकांबरोबर देशाला पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणताही चित्रपट बनत नाही. त्यानंतर मनोज कुमार यांनी अवघ्या 24 तासांत 'उपकार' चित्रपटाची कथा तयार केली. या चित्रपटात मनोज कुमार, आशा पारेख, प्राण आणि प्रेम चोप्रा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. विशेष म्हणजे या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनातही पदार्पण केलं.
मनोज कुमार यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार -
चित्रपटानं त्या वर्षी देशभर तिकीट बारीवर मोठी खळबळ निर्माण केली. या चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. या चित्रपटाच्या संगीतालाही उदंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील "मेरे देश की धरती" हे गाणं गेल्या सहा दशकापासून भारताच्या सर्व पिढ्या अभिमानानं ऐकत आल्या आहेत. या चित्रपटात मनोज कुमार यांनी भारत ही व्यक्तिरेखा साकारली. नंतरच्या असंख्य चित्रपटातून हाच भारत देशसेवा करत राहिला. आजही भारताचा स्वातंत्र्य दिन असो की प्रजासत्ताक दिन हे गाणं वाजतंच. 'उपकार' या चित्रपटासाठी मनोज कुमार यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच त्यांचा पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारही जिंकला होता.